खेळता-खेळता मुलगा खांबाला चिकटला, मृत्यू झालेलं बाजूच्यांना कळलंही नाही

खेळता-खेळता मुलगा खांबाला चिकटला, मृत्यू झालेलं बाजूच्यांना कळलंही नाही

हैदराबाद : शहरांमध्ये हाऊसिंग सोसायट्यांचं जाळं आहे. या सोसायट्यांबाहेर सकाळी आणि संध्याकाळी खेळत असणारी मुलं हे चित्र काही नवं नाही. सोसायटीच्या गार्डनमध्ये लहान मुलं खेळत असतात आणि इतर जण फिरतात.. बसलेले असतात.. अगदी तसंच हैदराबादमधल्या एका सोसायटीतही सुरू होतं. मंगळवारी सायंकाळ सव्वा सहा वाजेचा हा प्रकार आहे. लहान मुलं खेळतायेत, सायकल चालवतायेत, जेष्ठ नागरिक परिसरात फेरफटका मारतायेत.. त्याचवेळी खेळता खेळताच, एक मुलगा लाईटच्या खांबाला पकडतो.

सर्व मुलं आपापले खेळतायेत.. सोसायटीतील इतर रहिवासी फिरतात.. सगळं जसंच्या तसं सुरू आहे.. पण, या मुलाकडे कुणीही पाहिलं नाही. खांबाला चिकटून तो काही मिनिटे तसाच उभा होता. काही मिनिटानंतर हा मुलगा जमिनीवर कोसळतो. पावणे दोन मिनिटांच्या या व्हीडिओत अत्यंत सर्वसाधारण वाटणाऱ्या या दृश्यांमध्ये, या मुलाच्या मृत्यू कहाणी आहे.

ज्या पोलला मोनिश नावाच्या सहा वर्षीय चिमुकल्याने पकडलं होतं, त्या खांबाला जरा निरखून पाहा. वीज पुरवठा सुरू असलेल्या वायर्स अगदी बिनधास्तपणे या खांबाजवळ सोडण्यात आल्या होत्या.

सहा वर्षीय मोनिशची ती दृश्यं पुन्हा पाहा… 440 व्होल्टचा जीवघेणा करंट असलेल्या या खांबाला मोनिशने पकडलं आणि अवघ्या 20 सेकंदात त्याचा मृत्यू झाला. मुलगा खांबाला चिकटल्याची साधी कल्पनाही कुणाला आली नाही. हैदराबादच्या पार्कलँड सोसायटीतील ही घटना आहे. मंगळवारच्या या घटनेने सगळे नागरिक धास्तावले आहेत. देखभालीसाठी दर महिन्याला या सोसायटीतील प्रत्येक फ्लॅटधारक 6000 रुपये देतो. पण,असं असतानाही बिल्डरच्या अक्षम्य दुर्लक्षमामुळे मोनिशचा जीव गेला.

मोनिशचे वडील हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. कुटुंबीयांना सर्व सुख-सोयी मिळाव्यात, आरामात राहता यावं.. मुलांना खेळता-फिरता यावं, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून त्यांना या  PBEL सिटीच्या पार्कलँड सोसायटीत घर घेतलं. पण, एवढे पैसे खर्च केल्यानंतर बिल्डर, मेंटेनन्सच्या चुकीने, त्यांच्या पोटच्या गोळ्याचा करुण अंत झाला. मोनिशच्या मृत्यूचा पालकांना एवढा जबर धक्का बसला की ते हैदराबाद सोडून त्यांच्या राज्यात म्हणजे तामिळनाडूत परतले आहेत.

निरपराध रहिवासी आणि लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या बिल्डरविरोधात कठोर कारवाई होण्याची गरज आहे. उघड्या सोडलेल्या वायर्समुळे एखाद्याचा जीव जाईल एवढी साधी गोष्टही बिल्डर किंवा मेटेंनन्सवाल्यांना कळली नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय. ज्या कामासाठी रहिवासी हजारो रुपये देतात, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या या दोषींना शिक्षा तर मिळायलाच हवी. पण इतर नागरिकांनीही वेळीच मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे.

पाहा व्हिडीओ :


Published On - 5:14 pm, Wed, 13 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI