नांदेडमध्ये चिमुरडीवर अत्याचार, न्यायासाठी ग्रामस्थांनी नागपूर-तुळजापूर महामार्ग अडवला

नराधमाला कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग शुक्रवारी (28 फेब्रुवारी) सकाळपासून रोखून धरला.

नांदेडमध्ये चिमुरडीवर अत्याचार, न्यायासाठी ग्रामस्थांनी नागपूर-तुळजापूर महामार्ग अडवला

नांदेड : सोनखेड येथे एका चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या (Sonkhed Girl Sexual Assault) नराधमाला पोलिसांनी अटक केली . सुग्रीव मोरे (वय 28) असे या आरोपीचं नाव आहे. या नराधमाला कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग शुक्रवारी (28 फेब्रुवारी) सकाळपासून रोखून धरला. त्यामुळे सोनखेड गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

सोनखेड गावातील चिमुकली मंगळवारी (25 फेब्रुवारी) घराबाहेर खेळत होती (Sonkhed Girl Sexual Assault). खेळता-खेळता ती बेपत्ता झाली. मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या पालकांनी सोनखेड पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी रात्रभर मुलीचा शोध घेतला, मात्र ती कुठेही आढळली नाही. त्यानंतर बुधवारी (26 फेब्रुवारी) पहाटे ही मुलगी दगडगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर विवस्त्र अवस्थेत रडत असताना एका व्यक्तीला दिसली. त्या व्यक्तीने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मुलीला ताब्यात घेतलं. मुलीची अवस्था गंभीर होती. त्यामुळे पोलिसांनी तिला रुग्णलयात दाखल केले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी पोस्को आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सोनखेड गाठत याबाबतची इत्यंभूत माहिती घेतली. पोलिसांनी आपले खबरी या कामाला लावले. या दरम्यान, पोलिसांनी सुग्रीव मोरे या 28 वर्षीय आरोपीला संशयावरुन ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपी सुग्रीवने आपला या घटनेशी काहीही संबंध नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी गावातील लोकांना विश्वासात घेऊन सुग्रीव मोरे हाच आरोपी असल्याची खात्री करुन घेतली.

त्यानंतर गुरुवारी (27 फेब्रुवारी) रात्री रीतसरपणे आरोपी सुग्रीव मोरेवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे बुधवारी सकाळपासून सोनखेड आणि लोहा तालुक्यात तणाव पसरलेला आहे. या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून बंद पाळला. सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारीही गावात बंद पाळण्यात आला. इतकंच नाही तर गुरुवारी रात्री आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी आरोपीच्या घराला आग लावण्याची योजना आखली. मात्र, यावेळी पोलिसांनी घेतलेल्या सामंजसपणाच्या भूमिकेमुळे हा अनर्थ टळला आहे.

सुग्रीव मोरे याच्या अटकेनंतर शुक्रवारी गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. गावकऱ्यांनी नागपूर-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. या रास्ता रोको आंदोलनामुळे नांदेड आणि लातूर या दोन्ही दिशेला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या ठिकाणी कुठलीही अप्रिय घटना घडू नये, म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तानात करण्यात आला. सोनखेड मधल्या या घटनेच्या निषेधार्थ सर्वच पक्षांतील कार्यकर्ते एकत्र येऊन संताप व्यक्त करत आहेत.

दरम्यान, पोलीस तपासात सुरुवातीला आरोपी सुग्रीव मोरेने सहकार्य केले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, घटनाक्रम आणि काही गुप्त साक्षीदार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीमुळे आरोपीने शरणागती पत्करत गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने मुलीला तिच्या घरासमोरुन उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची कबुली दिली. तसेच, मुलीच्या कानातील सोन्याचे दागिने आरोपीने काढून घेतल्याची माहिती आहे.

अत्याचार करणाऱ्या आरोपीचा फोटो पीडित मुलीने ओळखल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, यातील आरोपी हा नशेखोर असून त्याने असे दुष्कृत्य यापूर्वीही केले असावेत अशी भीती गावकरी व्यक्त करत आहेत. पीडित मुलीच्या कुटुंबीयांची खासदार प्रताप पाटील चिखलीकर, केशवराव धोंडगे, आमदार मोहन हंबर्डे यांनी (Sonkhed Girl Sexual Assault) भेट घेऊन सांत्वन केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI