Special Report | पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूरमध्ये आरोग्य यंत्रणा खरंच सक्षम?

राज्यात फक्त पुण्यातीलच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, असं नाही. तर उपराजधानी नागपूरपासून ते कोल्हापूर आणि सोलापूरपर्यंत अशीच अवस्था आहे ( Health system in maharashtra).

Special Report | पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूरमध्ये आरोग्य यंत्रणा खरंच सक्षम?

मुंबई : राज्यात फक्त पुण्यातीलच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, असं नाही. तर उपराजधानी नागपूरपासून ते कोल्हापूर आणि सोलापूरपर्यंत अशीच अवस्था आहे. एक तर बेड मिळत नाही, मिळाले तर उपचार नाही. अनेक ठिकाणी कोव्हिड सेंटर उभारुन उद्घाटनंही झाले पण अजूनही रुग्णांना प्रवेशच नाही ( Health system in maharashtra).

1. नागपूरमधील परिस्थिती काय?

उपराजधानी नागपुरात सध्या दिवसाला 40 रुग्णांचा मृत्यू होतोय. सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड मिळत नाही. 16 खासगी रुग्णालयांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सध्या 32 हजार 705 इतकी झाली आहे. बुधवारी (2 सप्टेंबर) 1700 नव्या रुग्णांची भर पडली (Health system in maharashtra).

नागपुरातल्या सरकारी मेयो हॉस्पिटलच्या कोव्हिड सेंटरमध्ये 600 बेड्स आहेत. पण ते सर्व बेड्स सध्या भरले आहेत. 200 ICU बेड आहेत.  मात्र, सध्या एकही रिकामं नाही. 82 व्हेंटिलेटर्स आहेत. तेही पूर्ण वापरात आहेत.

नागपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये 600 बेड्स आहेत. ते पूर्ण भरले आहेत. 200 ICU बेड्सपैकी एकही रिकामं नाही. 83 व्हेंटिलेटर्सपैकी सध्या एकही उपलब्ध नाही. त्यातच 40 टक्के डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.

2. पिंपरी चिंचवडमधील परिस्थिती काय?

पिंपरी चिंचवडकरांची तर सरकारनं थट्टाच केलीय. 28 ऑगस्टला पालकमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 210 बेड्सच्या कोव्हिड रुग्णालयाचं उद्घाटन झालं. ऑटो क्लस्टरमधील कोव्हिड रुग्णालयात रुग्णांवर उपचार नाही. कारण सुविधा आणि डॉक्टर्सची उपलब्धता नाही.

26 ऑगस्टला अण्णासाहेब मगर स्टेडियमवर 816 बेड्सच्या जम्बो कोव्हिड सेंटरचे उद्घाटन झालं. मात्र इथंही फक्त 66 रुग्णांवर उपचार सुरु आहे. कारण सुविधा नाही आणि नव्या स्टाफला प्रशिक्षण देणं सुरु आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चूनही सुसज्ज हॉस्पिटल्स तयार का होत नाही? योग्य सुविधाच नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाची घाई का केली? हाही सवाल आहे.

3. कोल्हापूरमधील परिस्थिती काय?

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच कोव्हिड सेंटर हाऊसफुल्ल झाली आहेत. इथं बेडही शिल्लक नाही, ऑक्सिजनही नाही आणि व्हेंटिलेटरसुद्धा नाही. कोल्हापूर जिल्ह्यातल्या मृत्यूदर 3 टक्क्यांवर गेला आहे. सध्या 8 हजारांहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात 6 हजार 500 बेड्स आहेत, यापैकी एकही उपलब्ध नाही.1200 ऑक्सिजन आणि 135 व्हेंटिलेटर बेड असून सर्वच भरले आहेत.

4. सोलापूरमधील परिस्थिती काय?

सोलापूर जिल्ह्यात रुग्णांची संख्या 19 हजारांच्या घरात असून 769 जणांचा मृत्यू झाला आहे. पण शहर असो किंवा ग्रामीण भाग, सुविधा उपलब्ध नाहीत. कुठे व्हेंटिलेटर बेड्सची कमरता आहे तर, कार्डिअ‍ॅक अ‍ॅम्बुलन्स मिळत नाही. बार्शीत एका 28 वर्षीय कोरोनाबाधित विवाहितेला गेल्या शुक्रवारी अ‍ॅम्बुलन्स मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी अ‍ॅम्ब्युलन्स मिळाली पण तोपर्यंत उशीर झाला होता.

बार्शीतल्याच 32 वर्षीय तरुणाला तात्काळ व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता होती. पण 6 तास उलटूनही बेड मिळाला नाही. बेडसाठी वशिला लावायला लागतोय किंवा मग ओळखी हवी.

संबंधित बातमी : डॉक्टर्स, नर्स, वेळेवर औषध नाही, जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कसे उपचार दिले जातात? शरद पवारांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले

Published On - 11:40 pm, Thu, 3 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI