Movie Review : ‘धर्मा’चे स्टुडंट फेल

करण सरांनी 2012 मध्ये ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या सिनेमात एडमिशन देत वरुण-आलिया-सिध्दार्थला लॉंच केलं होतं. आता यावर्षी करण सरांनी त्यांच्या या युनिव्हर्समध्ये तारा सुतारिया आणि अनन्या पांडेला एडमिशन दिली आहे. या दोघांच्या सोबतीला टायगर श्रॉफ आहेच. ‘स्टुडंट ऑफ द ईयर’चा ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ हा सिक्वेल आहे. पहिल्या सिनेमाच्या तुलनेत या सिनेमाने हिरमोड […]

Movie Review : 'धर्मा'चे स्टुडंट फेल
Namrata Patil

|

Jul 05, 2019 | 3:46 PM

करण सरांनी 2012 मध्ये ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या सिनेमात एडमिशन देत वरुण-आलिया-सिध्दार्थला लॉंच केलं होतं. आता यावर्षी करण सरांनी त्यांच्या या युनिव्हर्समध्ये तारा सुतारिया आणि अनन्या पांडेला एडमिशन दिली आहे. या दोघांच्या सोबतीला टायगर श्रॉफ आहेच. ‘स्टुडंट ऑफ द ईयर’चा ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ हा सिक्वेल आहे. पहिल्या सिनेमाच्या तुलनेत या सिनेमाने हिरमोड केलाये. तारा सुतारिया आणि अनन्या पांडेचं या सिनेमातून बॉलिवूडमध्ये झालेलं आत्मविश्वासपूर्ण पदार्पण हेच या सिनेमाचं वैशिष्ट्य.

कल्पनेपलिकडचं विश्व असलं तरी रसिकांच्या हृदयात स्थान मिळणं धर्मा प्रॉडक्शनच्या सिनेमांचं वैशिष्ट्य होतं. जेव्हा धर्मा प्रॉडक्शनचे मालक प्रत्येक पाऊलावर सिनेमाच्या टीमसोबत असतं तेव्हा हे चित्र आपल्याला दिसत होतं. पण आता तर क्रिएटिव्ह टीम, प्रॉडक्शन टीम आणि मार्केटींग टीम मिळूनच हे प्रॉडक्शन हाऊस चालवते आहे असं दिसतंय. या टीममधल्या बहुतांश शिलेदारांच ज्ञान मुंबई ते विरारपर्यंतचं सिमित दिसतंय. त्यामुळेच तर यावर्षी आधी केसरी (त्यातल्या त्यात बरा होता), नंतर कलंक आणि आता ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ सारखे सलग तीन दिशाहिन चित्रपट या प्रॉडक्शन हाऊसनं दिलेत.

करण जोहर युवा दिग्दर्शकांवर प्रचंड विश्वास दाखवतोय. पण त्याच्या या विश्वासाला आता तडा जाऊ लागल्याचं दिसतं आहे.  दिग्दर्शक पुनित मल्होत्राला करण जोहरने तीन सिनेमांसाठी दिग्दर्शक म्हणून संधी दिली होती, पण त्याच्या या तिन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर दयनीय अवस्था झाली. त्यामुळे पुनीत अजूनही ‘आय हेट लव्ह स्टोरी’ आणि ‘गोरी तेरे प्यार मे’च्या पुढे जाण्याचं नाव घेत नसल्याचं स्पष्ट होत आहे.

‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ या चित्रपटाची कथा आहे मसुरीत राहणाऱ्या रोहन सेहगलची (टायगर श्रॉफ). रोहन लहानपणापासून त्याची मैत्रीण मृदुलावर (तारा सुतारिया) प्रेम करत असतो. तिच्या प्रेमापोटी रोहन देहरादुनमधील सेंट टेरेसा कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतो. कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर रोहनची भेट पोस्टर बॉय मानव मेहरा (आदित्य सील) आणि त्याची बहीण श्रेया (अनन्या पांडे)शी होते. मानव दोन वर्षांपासून ‘स्टुडंट ऑफ द ईयर’चा पुरस्कार पटकावत असतो आणि रोहनला मृदुलाला इंप्रेस करण्यासाठी हा किताब जिंकायचा असतो. चित्रपटाचं संपूर्ण कथानक स्टुडंट ऑफ द ईयरचा पुरस्कार आणि डिग्निटी कपभोवती फिरतं. सोबतीला रोहन-श्रेया-मृदुलाचा लव्हट्रॅण्गलही चित्रपटात पाहायला मिळतो.

या चित्रपटाच्या पहिल्या भागात दोन हिरो एक हिरोईन होती. तर या भागात एक हिरो दोन हिरोईन आहेत. एखाद्या सिनेमात पाहिजे ते सगळं या चित्रपटात आहे. गरीबी-श्रीमंतीचा पुर्वापार चालत आलेला ट्रॅक आहे, प्रेम-द्वेष-दगा-फटका आहे, लेटेस्ट फॅशन आहे, बॉडीबिल्डर हिरो आहे, मनसोक्त अंगप्रदर्शन करण्यासाठी ग्लॅमरस नायिका आहेत…पण..पण..फक्त फक्त कथा तेवढी नाही. यावरुन दिग्दर्शक पुनितला चांगला सिनेमा बनण्यासाठी कथा लागते, त्या कथेवर अभ्यास लागतो याचा विसर पडलेला दिसतोय. देहरादुनमधील बोर्डिंग स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थांबद्दल वांद्र्यातील कॉलेजमध्ये शिकलेल्या पुनितनं जरासाही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही.

पुनितकडे या सिनेमात स्वत:ला सिध्द करण्याची चांगली संधी होती. कारण एका हिट सिनेमाचा सिक्वेल त्याला करायचा होता. पुनितनं मात्र ही संधी गमावली. या सिनेमात ना ‘इश्कवाला लव्ह’ आहे ना ‘राधा चुनरी’. बऱ्याच ठिकाणी तर अति ड्रॅमेटिकपणा जाणवतो. सिनेमातील बऱ्याच घटना, प्रसंग तर कल्पनेपलिकडचे आहेत. अरे हे असं कधी झालं?. का झालं ? हे प्रश्न सिनेमा बघताना सतत पडत राहतात आणि नंतर ‘चल रे, हे असं कुठं असतं व्हय’, असं म्हणत आपण सिनेमागृहाबाहेर पडतो. चित्रपटात कधी ‘कुछ कुछ होता है’ डोकावतो तर कधी धर्माच्या याआधीच्या चित्रपटांमधील अनेक प्रसंग तुकड्या तुकड्यात जोडल्यासारखे वाटतात. चित्रपटाची कथा कॉलेजवर आधारीत असली, तरी एक सीन सोडला तर लेक्चर किंवा अभ्यासाचा एकही सीन सिनेमात नाही ही गोष्टही खटकते. कधी चित्रपटात डान्स कॉम्पिटिशनसाठी खटाटोप चाललेला असतो. तर कधी स्टुडंट ऑफ द ईयर बनण्यासाठी रस्सीखेच सुरु असते, हा या सिनेमाच्या कथेतील आणि ट्रॅकमधील सगळ्यात मोठा दोष आहे.

टायगर श्रॉफच्या अभिनयात तोच तो पणा जाणवतो. प्रत्येक सिनेमात टायगरचे एकच एक्सप्रेशन बघण्याची आता सवय झालीये.  त्या तुलनेत तारा सुतारियाने कमाल काम केलं आहे. तिचा वावरही आत्मविश्वासपूर्ण आहे. पण मध्यंतरानंतर तिला डावलल्यासारखं वाटतं. चंकी पांडेची मुलगी असल्यामुळे अनन्या पांडेकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. शिवाय इन्स्टाग्रामवरही प्रचंड मोठं फॅन फॉलोईंग असलेल्या अनन्याने चाहत्यांचा हा विश्वास सार्थ ठरवला आहे. तिने साकारलेली बबली, बिंधास्त तितकीच हळवी श्रेया कमाल झालीये. या सिनेमाचा अनन्याला नक्कीच पुढे फायदा होईल. बॅड बॉय मानवच्या भूमिकेत आदित्य सीलनंही कमाल काम केलंय. बऱ्याच प्रसंगात तो टायगरवर भारी पडलेला दिसतो. तर युटयुबस्टार हर्ष बेनीवालनेही मिळालेल्या संधीचा फायदा उठवला आहे. बऱ्याच प्रसंगात त्याने अचूक टायमिंग साधत घेतलेले पंच चेहऱ्यावर हास्याची कळी फुलवतात. संगीताच्या बाबतीतही चित्रपट निराश करतो. अनन्या आणि टायगरवर चित्रीत करण्यात आलेलं ‘फकीरा’ हे गाणं मात्र मस्त जमून आलंय.

एकूणच काय तर ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ हा मॉडर्न जमान्यातील ‘जो जीता वही सिंकदर’ आहे. करण सरांच्या या बॅचमधील हे सगळे ‘स्टुडंट’ यंदा बॉक्स ऑफिसच्या परीक्षेत फेल ठरलेत असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.

‘टीव्ही 9 मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय दोन स्टार्स. 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें