तेरी मेहरबानियाँ! पुण्यात कुत्र्याने हार्ट अटॅक आलेल्या मालकाचा जीव वाचवला

तेरी मेहरबानियाँ! पुण्यात कुत्र्याने हार्ट अटॅक आलेल्या मालकाचा जीव वाचवला

पुणे : एका कुत्रीच्या सतर्कतेमुळे पुण्यात डॉक्टरचा जीव वाचला आहे. पुण्यातील आदिनाथ सोसायटीमध्ये राहणाऱ्या 65 वर्षीय डॉ. संचेती यांचे प्राण ब्राऊनी नावाच्या कुत्रीने वाचवले आहेत. डॉ. संचेती यांना त्यांच्याच घरात हृदयविकाराचा झटका आला होता. यावेळी ब्राऊनीच्या सतर्कतेमुळे शेजारच्या अमित शहांना हे कळाले आणि डॉ. संचेतींचे प्राण वाचवण्यात यश आले.

पुण्यातील आदिनाथ सोसायटीमध्ये राहणारे डॉ. संचेती आणि प्राणीमित्र अमित शहा यांनी 16 वर्षांपूर्वी ब्राऊनी नावाच्या एका कुत्रीचे प्राण वाचवले होते. गेल्या 16 वर्षांपासून डॉ. संचेती आणि शहा हे ब्राऊनीची देखभाल करत आहेत.

23 जानेवारीला डॉ. रमेश संचेती यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यादिवशी दुपारच्या सुमारास शहा हे ब्राऊनीला जेवण भरवण्यासाठी आले होते. पण ब्राऊनी काहीही खात नव्हती. ती सतत संचेती यांच्या बेडरुमच्या खिडकीकडे जात होती. ब्राऊनी ही वारंवार डॉ. संचेतींच्या खिडकीकडे का जाते आहे, हे बघण्यासाठी शहा त्या खिडकीजवळ गेले. शहांनी खिडकीतून डोकावून बघितले, तेव्हा त्यांना डॉ. संचेती जमीनीवर कोसळलेले दिसले. शहांनी प्रसंगावधान दाखवत लगेच खिडकीचे ग्रील काढण्याचे प्रयत्न केले. ग्रील काढून संचेती यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हृदय विकाराचा झटका आला तेव्हा संचेती हे घरात एकटेच होते. जर ब्राऊनीने शहांना संकेत दिले नसते, तर डॉ. संचेती यांचा जीव धोक्यात आला असता.

कुत्रा हा एक प्रामाणिक प्राणी आहे, तसेच तो माणसाचा सच्चा मित्र म्हणूनही ओळखला जातो. कुत्रा हा त्यावर केलेले उपकार कधीही विसरत नाही, असे म्हणतात. 16 वर्षांआधी डॉ. संचेती यांनी ब्राऊनीचा जीव वाचवला होता आणि आज 16 वर्षांनंतर ब्राऊनीने त्या उपकाराची परतफेड करत डॉ. संचेती यांचे प्राण वाचवले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI