फक्त दोन विद्यार्थिनी आणि एक शिक्षक, चंद्रपुरातील आदर्श शाळा

फक्त दोन विद्यार्थिनी आणि एक शिक्षक, चंद्रपुरातील आदर्श शाळा

चंद्रपूर : पटसंख्येअभावी बंद पडलेल्या अनेक शाळांविषयी तुम्ही ऐकलं असेल. पण चंद्रपुरात एक अशी शाळा आहे, जी केवळ दोन विद्यार्थिंनींसाठी सुरु आहे. या दोन विद्यार्थिंनींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भविष्यासाठी अल्प पटसंख्या असतानाही ही शाळा नियमितपणे सुरु आहे. आजच्या आधुनिक युगात शिक्षण हा एक व्यवसाय झाला आहे. या व्यवसायामध्ये अशी शाळा ही दुर्मिळपणे पाहायला मिळते.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील आदिवासीबहूल टोमटा गावात एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत केवळ दोन विद्यार्थीनी शिकतात, या दोघीही सख्ख्या बहीणी आहेत.

संपूर्ण आदिवासी बहूल असलेल्या या गावातील बहुतेक कुटुंबांनी गावातून स्थलांतर केले. मात्र या दोन विद्यार्थीनींसाठी जिल्हा परिषदेने ही शाळा नियमितपणे सुरु ठेवली आहे.

चौथीत शिकणारी प्राची जिवनदास कुळसंगे आणि दुसरीत शिकणारी समिक्षा जिवनदास कुळसंगे या दोन विद्यार्थिनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आहेत. या दोघींना शिकवायला आनंदराव मडावी हे शिक्षक कार्यरत आहेत. टोमटा शाळेत दोन शिक्षकांची नियुक्ती आहे. मात्र शाळेची पटसंख्या अल्प असल्याने एकच शिक्षक शाळेत कार्यरत आहे. टोमटा शाळेच्या परिसरात अंगणवाडी देखील आहे. या अंगणवाडीत चार मुले आहेत. यातील समीर कुळसंगे हा पुढील वर्षी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणार आहे. समीर टोमटा शाळेची पायरी चढला, तर शाळेला एक नवा विद्यार्थी मिळणार आहे. समीर हा प्राची आणि समिक्षाचा भाऊ आहे.

टोमटा या गावाची लोकसंख्या 70 आहे, या गावात एकूण 17 कुटुंब राहातात. शेती आणि मजुरी हेच यांच्या रोजगाराचं साधन. त्यामुळे गावातील अनेक लोक स्थलांतर करत असतात. तर काहींनी आपल्या मुलांना आश्रमशाळेत दाखल केले आहे. याचा फटका जिल्हा परिषद शाळेला बसला आहे.

जर या दोघींनी शाळा सोडली तर शाळेला कुलूप लावण्याची वेळ येईल.

शासनाने ‘गाव तिथे शाळा’ स्थापन केली. मात्र इंग्रजी माध्यमातील शाळांच्या स्पर्धेत या सरकारी शाळा मागे पडल्या. टोमटा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची स्थिती दयनीय आहे. वर्ग एक ते पाचवीपर्यंत शिकण्याची सुविधा असलेल्या या शाळेची पटसंख्या केवळ दोन असणे हे खरचं दुर्भाग्यपूर्ण आहे. मात्र दोनच विद्यार्थिनी असल्या, तरी शाळा सुरु ठेवण्यासाठी जिल्हा परिषद आणि शिक्षक कार्यरत आहेत. त्यासाठी त्यांचे कौतुक करायला हवे. पण रोजगारासाठी, चांगल्या राहणीमानासाठी गावे ओसाड होत चालली आहेत, याचे जीवंत उदाहरण हे टोमटा गाव आहे.

Published On - 7:49 pm, Wed, 19 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI