ज्येष्ठ साहित्यिक ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे यांचे पुण्यात निधन

'झुलवा' कादंबरीमुळे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना वेगळी ओळख मिळाली आणि 'झुलवा'कार ही बिरुदावलीही प्राप्त झाली. (Zulwa Novelist Uttam Bandu Tupe passed away)

ज्येष्ठ साहित्यिक 'झुलवाकार' उत्तम बंडू तुपे यांचे पुण्यात निधन

पुणे : उपेक्षित आणि ग्रामीण जीवनाचं दर्शन आपल्या साहित्यातून घडवणारे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांचं पुण्यात निधन झालं. दीर्घ आजाराने वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अतिशय गाजलेल्या ‘झुलवा’ कादंबरीमुळे ‘झुलवा’कार नावाने ते ओळखले जात होते. (Zulwa Novelist Uttam Bandu Tupe passed away)

उत्तम बंडू तुपे उर्फ आप्पा हे यांच्या अनेक कादंबऱ्याना पुरस्कार मिळाले होते. ‘आंदण’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. ‘काट्यावरची पोट’ या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला होता. तर ‘झुलवा’ कादंबरीलाही राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. मात्र या कादंबरीमुळे तुपे यांना वेगळी ओळख मिळाली आणि ‘झुलवा’कार ही बिरुदावलीही त्यांना प्राप्त झाली.

खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भसम, चिपाड, इंजाल, झावळ, माती आणि माणसं या कादंबऱ्याही त्यांच्या विशेष गाजल्या होत्या. ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी ‘झुलवा’ कादंबरीवर आधारित नाटक दिग्दर्शित केलं होतं. अभिनेते सयाजी शिंदे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी नाटकात मुख्य भूमिका केल्या होत्या.

गेल्या अनेक महिन्यापासून उत्तम बंडू तुपे पक्षाघातामुळे आजारी होते. त्यांची पत्नी जिजा यांचेही काही महिन्यापूर्वीच पक्षाघातामुळे निधन झाले होते.

तुपे यांना त्रास वाढल्यामुळे दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुलं आहेत.

(Zulwa Novelist Uttam Bandu Tupe passed away)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI