Abhyanga Snan | अभ्यंग स्नानाची योग्य पद्धत माहितीये का? जाणून घ्या अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद यांचा परस्पर संबंध…

दिवाळी (Diwali 2021) म्हटलं की आठवतं ते अभ्यंग स्नान आणि मग हळूच पाय वळू लागतात ते मोती साबण घ्यायला. पण खरंच सांगू का, अभ्यंग स्नान म्हणजे फासला साबण आणि झाला अभ्यंग असं खरंच नाही. अभ्यंग स्नान ही एक शास्त्रशुद्ध संकल्पना आयुर्वेदाने कित्येक हजार वर्षांपूर्वी ग्रंथात मांडून दिली आहे.

Abhyanga Snan | अभ्यंग स्नानाची योग्य पद्धत माहितीये का? जाणून घ्या अभ्यंग स्नान आणि आयुर्वेद यांचा परस्पर संबंध...
Abhyanga Snan


मुंबई : दिवाळी (Diwali 2021) म्हटलं की आठवतं ते अभ्यंग स्नान आणि मग हळूच पाय वळू लागतात ते मोती साबण घ्यायला. पण खरंच सांगू का, अभ्यंग स्नान म्हणजे फासला साबण आणि झाला अभ्यंग असं खरंच नाही. अभ्यंग स्नान ही एक शास्त्रशुद्ध संकल्पना आयुर्वेदाने कित्येक हजार वर्षांपूर्वी ग्रंथात मांडून दिली आहे.

अभ्यंग याचा साधा सोप्पा अर्थ सांगायचा झाला, तर नित्य नियमाने सर्वांगाला तेल लावून स्नेहन (मालिश) करून त्वचेमध्ये तेल जिरवणे.

दिवाळी अभ्यंग स्नान

दिवाळी हा शरद ऋतू मध्ये येणारा सण. या ऋतू मध्ये बाहेरील हवामान हे उष्ण आणि रुक्ष झाल्याने शरीरामध्ये पित्ताचा प्रकोप होतो. उष्णतेमुळे शरीराची लाहीलाही होत, मुत्राचे प्रमाण कमी होऊन शरीरातील क्लेद (मल भाग) हा मूत्र मार्गाने कमी आणि स्वेद (घामातून) त्वचामार्गाने अधिक बाहेर पडतो. आयुर्वेदात त्वचा हे वाताचे स्थान सांगितले असून, स्वेदवह स्त्रोतसाच्या अधिक कर्मशीलते मुळे आणि वातावरण कोरडे झाल्याने त्वचा ही कोरडी पडायला लागते. त्यामुळे या काळात अभ्यंग म्हणजेच सर्वांगाला तेल चोळून त्वचेचा स्निग्धपणा टिकवण्यासाठी मदत होते. तेलाच्या स्निग्ध गुणामुळे हे कार्य सिद्धीस जाते.

अभ्यंग विधी आणि कार्य

आपल्या प्रकृती अनुसार वैद्यकीय सल्ल्याने योग्य तेल निवडून ते साधारण कोमट करून सकाळी प्रातः विधी पार पाडून सर्वांगाला तेल लावून जिरवावे. तळवे, पाय, कंबर, पोट, छाती, हात, मान, चेहरा, मस्तक या सगळ्या स्थांनाना कोमट तेलाने खालून वर अशा एकाच दिशेने हात फिरवत तेल जिरावावे. हे करत असताना आपल्या परिसरात हवा वाहत नसेल (पंखा, एसी चालू नसावा) याची खबरदारी घावी.

कोमट तेलाने अभ्यंग केल्याने शरीरातील त्वचेच्या आधारे राहणारा वात दोषाचे शमन होते, त्वचेखाली असलेल्या स्वेद नलिका प्रसारण पावून मोकळ्या होत शरीरातील क्लेद (मल भाग) बाहेर यायला सहज मदत होते. एवढे करून झाल्यावर साधारण अर्धा तास थांबून मग पुढील प्रक्रियेकडे वळावे.

उद्वर्तन / उटणे :

उद्वर्तन म्हणजेच सुगंधी द्रव्यांच्या चूर्णांनी शरीराला घर्षण (घासणे) करणे. यामध्ये त्रिफळा, सारिवा, नागरमोथा आदी द्रव्यांचा वापर केला जातो. तेलाभ्यंगामुळे शरीरातून बाहेर पडलेल्या क्लेदाला घर्षण म्हणजेच उद्वर्तन करून या चूर्णाच्या सहायाने घासून मोकळे करायला मदत होते. शिवाय त्वचेखाली साचलेला मेद (अनावश्यक चरबी) ही कमी व्हायला मदत होते.

उद्वर्तन / उटणे वापरण्याचा विधी

बाजारातून उटणे विकत न घेता आपल्या आयुर्वेदीय डॉक्टरांकडून उटणे चूर्ण बनवून घेणे.

त्वचा अधिक कोरडी असलेले / लहान मुलांसाठी – उटण्यामध्ये खोबरेल तेल किंवा दूध मिश्र करावे.

तेलकट त्वचा असलेल्यांनी त्या चूर्णामध्ये पाणी / नारळाचे पाणी टाकून वापरावे.

तेलाभ्यंग करून अर्ध्या तासाने हे उद्वर्तन / उटणे चूर्ण आपापल्या त्वचेनुसार योग्य द्रवातून सर्वांगाला घासावे. नंतर कोमट पाण्याने आंघोळ करावी. आंघोळ करताना साबणाचा उपयोग मात्र टाळावा.

अभ्यंग कालावधी

आयुर्वेदात वर्णन केल्याप्रमाणे रोज अभ्यंग करावे आणि शक्य नसल्यास निदान आठवड्यातून 3-4 वेळेस तरी किमान करावे. सकाळी प्रातः विधी संपवून अथवा रात्री झोपण्यापूर्वी करावे.

अभ्यांगाचे प्रकार आणि फायदे :

 1. शिरोभ्यंग : मस्तिष्क भागाला तेल लावणे. या मुळे डोकं शांत होते, ताण तणावापासून आराम मिळतो, शांत झोप लागते, मन एकाग्र होण्यास मदत होते.
 2. कर्ण पूरण : करंगळीला कोमट तेलामध्ये बुडवून दोन्ही कानामध्ये तेल लावणे. सोबत दोन्ही कानाच्या पाळीला तेल चोळणे. कान हे ही आयुर्वेदामध्ये वाताचे स्थान सांगितले आहे. शिवाय कर्ण इंद्रिय सक्षम राहण्यास मदत होते. शांत झोप लागते.
 3. नाभी पूरण : नाभी म्हणजेच बेंबी मध्ये मावेल एवढे कोमट तेल सोडून, मग तेच तेल पोट आणि ओटी पोटावर हलक्या हाताने चोळून जिरवावे. पोट आणि आसमंतातील अवयवांचे त्रास कमी होण्यास मदत होते. अजीर्ण, गॅस होणे, शौचास साफ न होणे ह्या तक्रारींवर हमखास चांगला परिणाम दिसून येतो.
 4. पादाभ्यंग : दोन्ही पायांच्या तळव्यांना हाताने किंवा काश्याच्या वाटीने घासून तेल चोळून लावावे. ज्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, दृष्टीला बल प्रदान होते, ताण तणाव कमी होतो, शरीरातील कोरडेपणा नाहीसा होण्यास मदत होते, झोप शांत लागते.
 5. सर्वांग अभ्यंग : पूर्ण शरीराला तेलाने अभ्यंग / स्नेहन करावे. वात दोषाचे शमन होते, त्वचा टवटवीत दिसते, प्रसन्न वाटते, त्वचा ही स्निग्ध आणि कोमल वाटू लागते.

अभ्यंग तेल नियमित वापरण्याचे फायदे :

 1. त्वचेचा कोरडेपणा नष्ट होतो.
 2. त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होण्याकरिता उपयोगी.
 3. त्वचा तेजस्वी आणि तरुण दिसते.
 4. रक्त संवहन सुधारते.
 5. वात दोषाचे शमन होऊन पुढे होणारे वात दोषामुळे रोग सहज टाळता येऊ शकतात.
 6. सहज शांत झोप लागते, शरीर आणि मन ताण तणावातून मुक्त होते.

उद्वर्तन / उटणे नियमित वापरण्याचे फायदे :

 1. त्वचा कोमल बनते.
 2. त्वचेला निखार येतो.
 3. त्वचेचा वर्ण उजळतो.
 4. त्वचेवरील डाग नाहीसे होण्यास मदत होते.
 5. चेहरा तेजस्वी, प्रसन्ना दिसतो.
 6. सुगंधी द्रव्यांमुळे मन प्रसन्न राहते.
 7. शरीरातील अनावश्यक मेद (चरबी / वजन) कमी होण्यास मदत होते.

नियमित अभ्यंग स्नान आणि उद्वर्तन / उटणे वापरल्याने प्रत्येकाला तरुण राहणे, ताण तणावमुक्त राहणे आणि प्रसन्न राहणे सहज शक्य आहे. ह्या उपचार पद्धतीला किंवा आयुर्वेदात वर्णित या दिनचर्येच्या उपक्रमांना आपलेसे करून घेतले तर निश्चितच आरोग्य रक्षण हा मंत्र दूर नव्हे. हेच उपचार आपण विविध केंद्रांमध्ये भरमसाठ खर्च करून घेण्यापेक्षा हा आपणच घरी करून आपलं आरोग्य ही निरोगी आणि प्रसन्न ठेवण्यास सहाय्य करू शकतो.

(वरील लेख हा आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. तेजस लोखंडे यांच्या माहितीवर आधारित आहे.)

हेही वाचा :

Skin Care Tips | निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी 4 आयुर्वेदिक औषधी वनस्पती वापरा, हिवाळ्यातही तजेलदार त्वचा मिळवा!

Diwali special mehndi design | दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणासाठी मेहंदी खास डिझाईन्स

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI