अंडी, चिकन का पनीर; कशात सर्वाधिक प्रोटीन? तुमच्या वजनानुसार काय बेस्ट?
वर्कआउटनंतर प्रोटीनची गरज सर्वांना असते. चिकन, अंडी आणि पनीर हे प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेत. पनीर शाकाहारींसाठी उत्तम पर्याय आहे. प्रत्येक पदार्थात विविध पोषकतत्वे आहेत, त्यामुळे तुमच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार निवड करा.

आपल्यापैकी अनेक जण दररोज वर्कआऊट, जीमला जात असतील. व्यायाम करणाऱ्या अनेकांना प्रोटीनसाठी काय खावं, हा प्रश्न अनेकदा पडलेला असतो. यातील काही जण प्रोटीन मिळावं म्हणून पनीर खातं, तर कोणी चिकन आणि अंडी खाण्याचा सल्ला देतं. यामुळे आपण अनेकदा गोंधळात पडतो. चिकन, अंडी की पनीर कोणत्या पदार्थात नेमकं जास्त प्रोटीन असते, याबद्दल आपण वारंवार रिसर्च करत असतो. पण खरं सांगायचं तर हे तिन्ही पदार्थ प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेत. यात अनेक पोषक घटकही आहेत. पण मग या तिघांमध्ये नेमका कशात आणि कोणता फरक आहे, काय चांगलं आहे, हे जाणून घेऊया.
अंड्यात किती प्रोटीन?
अंडं हे प्रोटीनचा एक उत्तम आणि स्वस्त स्रोत आहे. एका मध्यम आकाराच्या अंड्यात साधारण 13 ग्रॅम प्रोटीन असतं. यात फक्त प्रोटीनच नाही, तर व्हिटॅमिन बी, बी12, डी, ई, आणि फॉस्फरस सारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. विशेष म्हणजे, अंड्याचा पांढरा भाग शुद्ध प्रोटीनचा सर्वोत्तम स्रोत आहे. तसेच पिवळ्या बलकमध्ये निरोगी फॅट्स आणि इतर व्हिटॅमिन्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
पनीरमध्ये किती प्रोटीन?
जे लोक मांसाहार करत नाही त्यांच्यासाठी पनीर हा कायमच उत्तम पर्याय मानला जातो. पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. 100 ग्रॅम पनीरमध्ये सुमारे 20 ते 25 ग्रॅम प्रोटीन असतं. यात कार्बोहायड्रेट्स आणि लॅक्टोजचे प्रमाण कमी असल्यामुळे ते सहज पचतं. याशिवाय, पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्याने ते हाडांना मजबूत बनवते.
चिकनमध्ये असते सर्वाधिक प्रोटीन
जेव्हा प्रोटीनचा विषय निघतो, तेव्हा मांसाहारी लोक प्रोटीनसाठी चिकनला पहिली आणि सर्वाधिक पसंती देतात. ते योग्यच आहे. कारण हेल्थलाइननुसार, 100 ग्रॅम चिकनमध्ये 20 ते 30 ग्रॅम प्रोटीन असतं. पण, हे प्रमाण चिकन कशाप्रकारे शिजवलं आहे, त्यावर अवलंबून असतं. चिकनमध्ये प्रोटीनसोबतच अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. विशेष म्हणजे चिकन खाल्ल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहते, असेही तज्ज्ञ सांगतात.
शरीराला जेवढे आवश्यक तेवढे प्रोटीन्स घ्या
प्रोटीनची गरज प्रत्येकाच्या शरीराच्या वजनानुसार आणि वयानुसार बदलते. उदाहरणार्थ, 75 किलो वजनाच्या व्यक्तीला दररोज सुमारे 60 ग्रॅम प्रोटीनची आवश्यकता असते. हे तिन्ही पदार्थ प्रोटीनचे उत्तम स्रोत असले तरी, त्यांच्यातील प्रोटीनची मात्रा कमी-जास्त होते. यानुसार 100 ग्रॅम चिकनमध्ये 20-30 ग्रॅम प्रोटीन असतं. तर 100 ग्रॅम पनीरमध्ये 20-25 ग्रॅम प्रोटीन असतं. तसेच एका मध्यम आकाराच्या अंड्यात सुमारे 13 ग्रॅम प्रोटीन असतं.
यानुसार तुमच्या शरीराला जेवढे आवश्यक तेवढे प्रोटीन्स आपण दररोज घ्यायला हवेत. तसेच चिकनमध्ये सर्वात जास्त प्रोटीन आढळतं, याचा अर्थ असा नाही की अंडी किंवा पनीर कमी महत्त्वाचे आहेत. चिकन, पनीर आणि अंडी हे तिन्ही पदार्थ त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे आणि उपलब्धतेमुळे आपल्या आहारात महत्त्वाचे आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार यापैकी कोणत्याही पदार्थाचा आहारात समावेश करू शकता.
