सकाळी उठल्या उठल्या चहा पिताय? या गंभीर समस्या होऊ शकतात
भारतात मोठ्या संख्येने लोक रिकाम्या पोटी चहा पिऊन दिवसाची सुरुवात करतात. पण सकाळी रिकाम्या पोटी चहा पिल्याने तुमच्या आरोग्याला किती नुकसान होऊ शकते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

आरोग्य आणि फिटनेस टिकवण्यासाठी फक्त योग्य आहारच नव्हे, तर सकाळच्या सवयीही खूप महत्त्वाच्या असतात. सामान्यतः असं मानलं जातं की, दिवसाची सुरुवात जशी होते, त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. विशेषतः यकृताच्या (लिव्हर) आरोग्यासाठी सकाळची जीवनशैली खूप महत्त्वाची मानली जाते. भारतात मोठ्या संख्येने लोक दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी चहा पिऊन करतात. काही लोक ऊर्जेसाठी पितात, तर काही पोट साफ करण्याच्या सवयी म्हणून, पण तुम्ही कधी विचार केलाय का की, सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणं तुमच्या आरोग्याला किती नुकसान पोहोचवू शकतं?
रिकाम्या पोटी चहा का त्रासदायक ठरू शकतो?
खरं तर चहात कॅफिन आणि टॅनिनसारखे घटक असतात. हे दोन्ही घटक रिकाम्या पोटी शरीरावर थेट परिणाम करतात. सकाळी पोट जास्त संवेदनशील असतं, आणि अशा वेळी चहा पिण्याने अॅसिडिटी, गॅस आणि अपचन (इंडायजेशन) ची तक्रार होऊ शकते. ही सवय लांब काळ टिकली तर पचनसंस्था कमकुवत होऊ शकते.
यकृतावरही परिणाम होतो
तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी चहा पिण्याने यकृताच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे यकृतात सूज येणे आणि फॅटी लिव्हर सारख्या समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो. सकाळी उठल्यावर चहा पिण्याऐवजी शरीराला प्रथम पाणी आणि हलके पोषणाची गरज असते.
लोहाची (आयर्न) कमतरतेचा धोका
चहातील टॅनिन शरीरातील लोहाचे शोषण रोखते. जर एखादी व्यक्ती दररोज रिकाम्या पोटी चहा पित असेल, तर कालांतराने हीमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते. याचा परिणाम थकवा, कमजोरी, केस गळणे आणि इतर समस्या म्हणून दिसू शकतो.
गट हेल्थवर नकारात्मक परिणाम
सकाळी शरीराला पाणी आणि फायबरची गरज असते, जेणेकरून आतड्यातील चांगले बॅक्टेरिया सक्रिय होऊ शकतील. पण रिकाम्या पोटी चहा पिण्याने गट मायक्रोबायोमचे संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे पचन कमकुवत होते आणि पोषक तत्वांचे योग्य शोषण होत नाही.
तज्ज्ञ काय सल्ला देतात?
तज्ज्ञांच्या मते, चहा पिण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी उठल्यावर सुमारे दोन तासांनी किंवा नाश्ता केल्यानंतर एक तासाने. यामुळे चहाचा शरीरावर नकारात्मक परिणाम होत नाही. तसेच दिवसाची सुरुवात १ ते २ ग्लास पाणी, फळे किंवा हलक्या नाश्त्याने करणे जास्त फायद्याचे मानले जाते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
