फफूंदी, किडींपासून गव्हाचे संरक्षण करण्यासाठी आजमवा हे पारंपरिक उपाय…
आजच्या काळात शुद्ध अन्नपदार्थांची गरज वाढलेली असताना, रसायन विरहित साठवणूक ही काळाची गरज आहे. पारंपरिक उपाय हे फक्त सुरक्षितच नाहीत, तर पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायीही आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी गहू साठवायचं ठरवलं, तर हे नैसर्गिक उपाय नक्की वापरून बघा...

गहू हे आपल्या आहारातील एक प्रमुख धान्य आहे आणि बहुतांश कुटुंबांमध्ये वर्षभराचा साठा एकाच वेळी करून ठेवला जातो. मात्र, गव्हाचा साठा सुरक्षित ठेवणं हे काही सोपं काम नसतं. चुकीच्या पद्धतीनं साठवणूक केल्यास गहू फफूंदी, बुरशी, किडी आणि आर्द्रतेमुळे खराब होतो. त्यामुळे वर्षभराचा गहू खराब होण्याची आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत अनेकजण बाजारातील रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात, पण याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. म्हणूनच, पारंपरिक आणि नैसर्गिक उपाय वापरून गहू साठवण अधिक सुरक्षित करता येते.
गव्हाच्या साठवणुकीपूर्वी काय करावे ?
गहू साठवण्यापूर्वी त्याची योग्य साफसफाई करणे गरजेचं असतं. गहू खरेदी केल्यानंतर ३ ते ४ दिवस उन्हात पसरून वाळवणे आवश्यक आहे. यामुळे त्यातील आर्द्रता कमी होते आणि फफूंदी किंवा कीटकांची वाढ रोखली जाते. त्यानंतर स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद ड्रम, डबे किंवा प्लास्टिक कंटेनरमध्ये गहू साठवावा.
किडींपासून बचावासाठी हे आहेत पारंपरिक उपाय
गव्हामध्ये किडी न पडाव्यात यासाठी अनेक पारंपरिक उपाय वापरले जातात. त्यातील एक म्हणजे गव्हामध्ये कोरडं नीमाचं पान टाकणं. नीमाची पाने नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करतात आणि गहू बिघडण्यापासून वाचवतात. याशिवाय लवंग किंवा काळी मिरी यांचा वापर करूनही कीड दूर ठेवता येते.
* बॉरॅक्स किंवा नैसर्गिक चुन्याचा वापर
काही भागांमध्ये बॉरॅक्स किंवा नैसर्गिक चुन्याचा पातळ थर साठवणुकीच्या डब्याच्या तळाशी दिला जातो. यामुळे कीटक आत प्रवेश करत नाहीत आणि धान्य दीर्घकाळ टिकते. हा उपाय घरगुती पातळीवर अगदी सहज वापरता येतो.
* मेथीच्या दाण्यांचा उपयोग
गहू साठवताना त्यात थोडे मेथीचे दाणे मिसळल्यास कीटक आणि फफूंदी दूर राहते, असं ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी मानलं जातं. मेथीची वास गव्हात पसरते आणि त्यामुळे किडींची उत्पत्ती होत नाही.
* हवाबंद कंटेनर आणि कोरडं ठिकाण निवडा
गहू साठवताना वापरण्यात येणाऱ्या कंटेनरला घट्ट झाकण असलेलं पाहिजे. हवाबंद डबे गव्हात ओलावा जाण्यापासून वाचवतात. याशिवाय गहू ठेवण्यासाठी निवडलेली जागा कोरडी, हवेशीर आणि थेट सूर्यप्रकाशापासून दूर असावी. ज्या घरांमध्ये भाजीपाला साठवला जातो, त्या ठिकाणी गहू ठेवणं टाळावं, कारण अशा ठिकाणी ओलावा अधिक असतो.
* कीटकनाशकाशिवाय साठवण शक्य
अनेक घरांमध्ये अजूनही जुन्या पद्धतीने म्हणजे लोखंडी डब्यात किंवा कडधान्याच्या पोत्यात गहू साठवला जातो. अशा वेळी दर महिन्याला गव्हाचा एक भाग बाहेर काढून उन्हात वाळवणं उपयुक्त ठरतं. या प्रक्रियेमुळे गहू ताजा राहतो आणि त्यात कोणतीही बुरशी लागत नाही.
