Mushroom | ‘व्हिटामिन डी’चा नैसर्गिक स्त्रोत, जाणून घ्या ‘मशरूम’ खाण्याचे फायदे…

'मशरूम' बहुतेक शाकाहारी लोकांची आवडती भाजी आहे. ‘मशरूम’ स्वादिष्ट असण्याव्यतिरिक्त, आपल्या  शरीरासाठीही खूप फायदेशीर आहे.

Mushroom | ‘व्हिटामिन डी’चा नैसर्गिक स्त्रोत, जाणून घ्या ‘मशरूम’ खाण्याचे फायदे...

मुंबई : ‘मशरूम’ बहुतेक शाकाहारी लोकांची आवडती भाजी आहे. ‘मशरूम’ स्वादिष्ट असण्याव्यतिरिक्त, आपल्या  शरीरासाठीही खूप फायदेशीर आहे. मशरूममध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. तसेच, त्यात अनेक पौष्टिक घटक देखील आढळतात. मशरूम कडी, कोशिंबीरी, सूप आणि भाजी इतकेच नव्हेतर, नुसते बटरमध्ये टॉसकरून नाश्त्यासारखे देखील खाता येऊ शकते. ‘मशरूम’ आपल्या आरोग्यासाठी इतके लाभदायी आहेत की, आपण आपल्या रोजच्या आहारात मशरूमचा समावेश करू शकतो (Health Benefits Of Mushroom).

‘व्हिटामिन डी’चा उत्तम स्रोत

‘व्हिटामिन डी’ शरीरासाठी खूप महत्वाचा घटक आहे. शरीरात ‘व्हिटामिन डी’ची कमतरता असल्यास बरेच आजार उद्भवतात. नैसर्गिकरित्या ‘व्हिटामिन डी’ आढळणाऱ्या भाज्या आणि फळे तशी कमीच आहेत. यापैकीच एक भाजी आहे मशरूम. मशरूममध्ये ‘व्हिटामिन डी’ मुबलक प्रमाणात आढळते. दररोज मशरूम खाल्ल्याने शरीराला आवश्यक तितके ‘व्हिटामिन डी’ नैसर्गिकरित्या मिळू शकते. ‘पांढरे मशरूम’ आणि ‘पोर्टेबेला मशरूम’मध्ये ‘व्हिटामिन डी’ चांगल्या प्रमाणात आढळते.

सेलेनियमने समृद्ध

सेलेनियम शरीरात अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. ‘सेलेनियम’ हा घटक फ्री-रॅडिकल्समुळे शरीराचे नुकसान होण्यापासून बचाव करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो. मशरूममध्ये भरपूर प्रमाणात सेलेनियम आढळते. हे नैसर्गिक सेलेनियम शरीराला आतून निरोगी ठेवते (Health Benefits Of Mushroom).

वजन कमी करण्यास प्रभावी

मशरूममध्ये अतिशय कमी कॅलरी असतात. 5 पांढरे मशरूम किंवा एक संपूर्ण पोर्टेबेला मशरूममध्ये केवळ 20 कॅलरीज असतात. शिवाय मशरूममध्ये फायबर असल्याने, त्यांच्या सेवनाने पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते आणि भूकही लवकर लागत नाही. यामुळे तुम्हाला जंक फूड आणि ओव्हरईटिंग टाळता येणे शक्य होते. परिणामी हा फरक आपल्या शरीरावर दिसू लागतो.

मशरूम खाण्याचे विविध प्रकार

न्यूट्रिशनिस्ट म्हणतात की, आपण आपल्या आहारात अनेक प्रकारच्या गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत. मशरूम ही एक खाण्यास चविष्ट आणि बनवण्यास अतिशय सोपी भाजी आहे. यातील पौष्टिकता टिकवण्यासाठी मशरूम कुठल्याही प्रकारे शिजवणे फायदेशीर ठरते. ‘मशरूम’च्या विविध पाककृती बनवणे खूप सोपे आहे. आपण आपल्या रोजच्या आहारात कोशिंबीर, भाजी किंवा सूपसारख्या पदार्थांतून ‘मशरूम’चा समावेश करू शकता.

टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठल्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

(Health Benefits Of Mushroom)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI