IRCTC तिकीट बुकिंगसाठी ‘हा’ नंबर ठेवा चालू, नाहीतर OTP येणारच नाही
तुमचा फोन नंबर केवळ बोलण्यासाठी नाही, तर अनेक महत्त्वाच्या सरकारी आणि वित्तीय व्यवहारांसाठीही वापरला जातो. त्यामुळे 1 जुलै 2025 पासून लागू झालेल्या IRCTC च्या या नव्या नियमाचा प्रभाव तुमच्यावर होऊ नये, यासाठी मोबाईल नंबरबाबतची ही चूक टाळा.

1 जुलै 2025 पासून IRCTC ने रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. यानुसार, आता तात्काळ तिकीट बुक करताना आधार कार्ड वेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आले आहे. यासोबतच IRCTC खात्याला आधार क्रमांक लिंक करणेही गरजेचे ठरले आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या फोन नंबरसंबंधी एक सामान्य पण गंभीर चूक करत असाल, तर तुम्हाला तिकीट बुक करणेच शक्य होणार नाही.
फोन नंबरबाबत कोणती आहे ती ‘सामान्य’ चूक?
आपल्यातील अनेकजण आपला फोन नंबर दीर्घकाळ रिचार्ज न करता बंद ठेवतात. हीच चूक मोठ्या अडचणीला कारणीभूत ठरू शकते. जर तुम्ही तोच नंबर IRCTC खात्यात, आधार कार्डात, बँकिंग सेवांमध्ये किंवा UPI सेवा जोडण्यासाठी वापरला असेल, तर त्यावर OTP येणार नाही आणि त्यामुळे वेरिफिकेशन पूर्ण होणार नाही. विशेषतः तात्काळ तिकीट बुक करताना OTP अनिवार्य असतो. जर तो नंबर बंद असेल, तर तुम्ही तिकीट बुकच करू शकणार नाही.
काय आहे IRCTC चा नवा नियम?
नवीन नियमानुसार, IRCTC खात्यात लॉगिन करण्यासाठी किंवा तात्काळ तिकीट बुक करताना आधार वेरिफिकेशन अनिवार्य आहे. हे वेरिफिकेशन आधार क्रमांकासोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर येणाऱ्या OTP द्वारे पूर्ण होणार आहे. म्हणूनच, तुमचा जो मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे, तो नेहमी कार्यरत ठेवणं आवश्यक आहे.
या चुका टाळण्यासाठी काय कराल?
तुमचा जो नंबर आधारशी लिंक आहे तो नंबर नेहमी चालू ठेवावा.
जर तो नंबर बंद असेल तर तात्काळ रिचार्ज करून तो पुन्हा सक्रिय करा.
किमान काही महिन्यांनी एकदातरी रिचार्ज करून नंबर सक्रिय ठेवण्याची काळजी घ्या.
जर तुम्ही नियमित वापरत असलेला नंबर दुसरा असेल, तर तोच नंबर आधारशी लिंक करून अपडेट करा.
भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी…
जर तुम्ही वरील गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, तर IRCTC खाते लॉक होण्याची शक्यता निर्माण होते, किंवा तुम्हाला तात्काळ तिकीट बुक करता येणार नाही. त्यामुळे काळजी घ्या आणि तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक करून नेहमी कार्यरत ठेवावा.
