पावसाळ्यात कोथिंबीर, टोमॅटो, केळी खराब होऊ नये म्हणून काय करायचं?
Monsoon: पावसाळ्याच्या दिवसात अशा समस्या उद्भवू नयेत म्हणून लोक दररोज बाहेर जाणं टाळतात. मग रोजच्या भाज्या कशा आणणार? या भाज्या जास्तीच्या आणल्या जातात आणि त्या स्टोअर केल्या जातात. पण मग या भाज्या खराब होतात.

मुंबई: देशभरात पावसाळा सुरूच आहे. संततधार पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी त्याचवेळी रस्त्यावर चिखल, पाणी साचणे अशा इतर समस्याही सुरू झाल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसात अशा समस्या उद्भवू नयेत म्हणून लोक दररोज बाहेर जाणं टाळतात. मग रोजच्या भाज्या कशा आणणार? या भाज्या जास्तीच्या आणल्या जातात आणि त्या स्टोअर केल्या जातात. पण मग या भाज्या खराब होतात. ही फळे आणि भाज्या नीट ठेवल्या नाहीत तर त्या खराब व्हायला वेळ लागत नाही. त्यांना अनेक दिवस सुरक्षित ठेवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास टिप्स सांगणार आहोत.
पावसाळ्यात भाज्या साठवण्याच्या टिप्स
केळी
केळी हे फळ 12 महिने सतत खाल्ले जाते. परंतु पावसाळ्याच्या दिवसात ते व्यवस्थित स्टोअर करून ठेवणे खूप महत्वाचे आहे, अन्यथा ते 2 दिवसात खराब होतात. अशा वेळी साठवण्यापूर्वी ते नीट धुवून घ्या. यानंतर पेपर टॉवेल किंवा टिश्यू पेपर घेऊन ओला करावा. यानंतर तो कागद केळीभोवती गुंडाळून ठेवावा. असे केल्याने केळी अनेक दिवस खराब न होता राहू शकते.
कांद्याची पात
पावसाळ्याच्या दिवसात कांद्याची पात खराब होणे ही देखील एक समस्या आहे. यासाठी आपण टिश्यू पेपर देखील वापरला पाहिजे. कांद्याची पात भोवती टिश्यू पेपर गुंडाळून त्यावर थोडे पाणी शिंपडावे. यानंतर टिश्यू पेपरसह फ्रीजमध्ये ठेवा. असे केल्याने कांद्याची पात बराच काळ खाण्यायोग्य राहते.
कोथिंबीर
पावसाळ्याच्या दिवसात कोथिंबीर क्वचितच मिळते.कोथिंबीर लगेच खराब होते. अशा वेळी ती व्यवस्थित स्टोअर करून ठेवणे हे आपल्यासाठी आव्हानात्मक ठरते. कोथिंबिरीच्या देठावर टिश्यू पेपर गुंडाळून नंतर थोडे ओले करा. मग ग्लास घेऊन त्यात कोथिंबीर टिश्यू पेपर सहित उभी करा. त्या कोथिंबिरीची पाने ताजी हिरवी राहतील.
टोमॅटो
आता तर टोमॅटो प्रचंड महाग आहेत. पावसाळ्यात टोमॅटोची आवकही कमी होते. जे काही थोडं मिळतं, ते ही खूप महागात पडतं. अशावेळी तुमचे मौल्यवान टोमॅटो सडणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी टोमॅटोच्या देठाच्या जागी टेप चिकटवून फ्रिजमध्ये ठेवावे. असे केल्याने टोमॅटो बराच काळ फ्रेश राहतात.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)
