पावसाळ्यात वॅक्सिंग करताना ‘या’ टिप्स करा फॉलो, नाही तर होतील गंभीर परिणाम
पावसाळ्यात वॅक्सिंगशी संबंधित काही सामान्य समस्या निर्माण होत असतात. यासाठी पावसाळ्यात थोडीशी खबरदारी घेऊन आणि योग्य पद्धत अवलंबून तुम्ही तुमच्या त्वचेला या समस्यांपासून वाचवू शकता.

पावसाळा येताच हवामान अगदी थंड आणि दमट होते. तसेच हवामान आरामदायी असले तरी आपल्या आरोग्याच्या आणि त्वचेच्या बाबतीतही अनेक आव्हाने घेऊन येते. विशेषतः महिलांसाठी या ऋतूत त्यांच्या स्किन केअरच्या रूटिंगमध्ये अनेक समस्या निर्माण होतात. खास करून या दिवसांमध्ये वॅक्सिंग करणे खूप त्रासदायक असते. कधीकधी त्वचेवर पुरळ उठतात, कधीकधी वॅक्स व्यवस्थित चिकटत नाही, ज्यामुळे त्वचेवर नको असलेले केस पूर्णपणे निघत नाहीत. याशिवाय त्वचेवर चिकटपणा आणि घामामुळे त्वचा आणखी संवेदनशील होते.
त्यामुळे जर वॅक्सिंग योग्यरित्या केले नाही तर ते त्वचेला देखील नुकसान पोहोचवू शकते. त्याचवेळी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वारंवार पार्लरमध्ये जाणे देखील कठीण होते. म्हणून पावसाळ्यात वॅक्सिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून त्वचा सुरक्षित राहील आणि वॅक्स करणे देखील सुरळीत होईल. चला तर मग जाणून घेऊया काही सोप्या आणि प्रभावी टिप्स, ज्यांचा अवलंब करून तुम्ही या पावसाळ्यातही कोणत्याही समस्येशिवाय वॅक्सिंग करू शकता.
1. वॅक्सिंग करण्यापूर्वी त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा
पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि घामामुळे त्वचेवर घाण साचते. वॅक्सिंग करण्यापूर्वी सौम्य क्लींजर किंवा अँटीसेप्टिक वाइपने त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा. यामुळे संसर्गाचा धोका कमी होईल आणि वॅक्स चांगले चिकटेल.
2. पावडरचा वापर करा
जर त्वचेवर जास्त घाम येत असेल तर वॅक्स योग्यरित्या त्वचेला चिकटत नाही, त्यामुळे वॅक्सिंग नीट होत नाही. अशावेळेस वॅक्सिंग करण्यापूर्वी थोडीशी टॅल्कम पावडर लावा. कारण पावडर त्वचेवर लावल्याने ओलावा शोषून घेते आणि वॅक्सिंग प्रक्रिया सुलभ करते.
3. गरम वॅक्सऐवजी थंड वॅक्स वापरा
पावसाळ्यात त्वचेवर आधीच जळजळ होते, त्यामुळे गरम वॅक्समुळे त्वचेच्या समस्येत आणखीन वाढ होऊ शकते. जळजळ किंवा लालसरपणा येऊ शकतो. म्हणून, थंड वॅक्स किंवा शुगर वॅक्स वापरा. ते त्वचेला मऊ करते आणि समस्या जास्त प्रमाणात उद्भवत नाही. तसेच या वॅक्सच्या सहाय्याने त्वचेवरील नको असलेले केस पूर्णपणे काढून टाकते.
4. तुमची त्वचा एक्सफोलिएट करायला विसरू नका
वॅक्सिंगच्या एक दिवस आधी त्वचेला हळूवारपणे एक्सफोलिएट करा. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि केस वाढण्याचा धोका कमी होतो. तुम्ही ओटमील किंवा कॉफी स्क्रब सारखे नैसर्गिक स्क्रब वापरू शकता.
5. वॅक्सिंग केल्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावा
वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा कोरडी आणि संवेदनशील होते. म्हणून, त्वचा मऊ ठेवण्यासाठी आणि लालसरपणा टाळण्यासाठी कोरफड किंवा कॅमोमाइल असलेले मॉइश्चरायझर लावा. यामुळे जळजळ कमी होईल आणि त्वचेला आराम मिळेल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
