नेल कटरमध्ये लपलेले ‘हिडन टूल्स’, असा वापर केल्यास घरगुती कामं होतील सोपी!
बाजारात अनेक प्रकारचे नेल कटर उपलब्ध आहेत. खरेदी करताना स्टेनलेस स्टीलचे आणि चांगल्या दर्जाचे नेल कटर निवडा. स्वस्त नेल कटरमुळे नखांना इजा होऊ शकते. तसंच, नेल कटर नियमितपणे स्वच्छ करत राहा, जेणेकरून जंतूसंसर्ग टाळता येईल.

स्वच्छता आणि आरोग्याची काळजी घेणं आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नखं स्वच्छ नसतील तर बोटांमध्ये जंतू वाढतात. यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. म्हणूनच नखं कापण्यासाठी नेल कटरसारखं छोटं पण उपयुक्त साधन प्रत्येकाच्या घरात असतं.
पूर्वी लोक नखं कापण्यासाठी ब्लेड किंवा चाकू वापरायचे. पण आता बाजारात आधुनिक नेल कटर उपलब्ध आहेत. हे वापरण्यास सोपे तर आहे, शिवाय खिशातही सहज बसते. पण तुम्ही कधी लक्ष दिलंय का, की बहुतेक नेल कटरमध्ये नखं कापण्याच्या मुख्य ब्लेडशिवाय दोन छोटी अतिरिक्त उपकरणं असतात? या उपकरणांचा उपयोग काय, हे फार कमी लोकांना माहीत आहे. चला, या लेखात याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
नेल कटरचं डिझाईन : नेल कटर वेगवेगळ्या डिझाइनमध्ये मिळतात. काहींमध्ये फक्त नखं कापण्याचं ब्लेड असतं. तर काहींमध्ये ब्लेडसोबत दोन अतिरिक्त उपकरणंही असतात. याशिवाय नेल कटरची खास गोष्ट म्हणजे त्यावर खरखरीत पृष्ठभाग असतो. याला फाइल म्हणतात. ही फाइल नखं रगडून त्यांना नीट आकार देण्यासाठी वापरली जाते.
नेल कटरमधील दोन अतिरिक्त उपकरणांपैकी एक उपकरण छोट्या चाकूसारखं काम करतं. उदाहरणार्थ, प्रवासात असताना तुमच्याकडे चाकू नसेल, तर या उपकरणाने तुम्ही फळं कापू शकता. तसंच, छोटं छिद्र पाडण्यासाठीही याचा उपयोग होतो. या उपकरणाचा वापर सावधगिरीने करणे आवश्यक आहे.
घट्ट झाकण उघडण्यासाठी…
दुसरं उपकरण वेगळ्या प्रकारचं आहे. त्याचं डिझाइन पाहिलंत, तर तुमच्या लक्षात येईल की ते इतर चाकूंसारखं नाही. हे उपकरण काचेच्या बाटलीचं घट्ट झाकण किंवा सील उघडण्यासाठी खूप उपयोगी आहे. त्याचं वाकडं डिझाइन झाकणाला पकडून ते सहज उघडण्यास मदत करतं. बऱ्याचदा हे उपकरण नखं स्वच्छ करण्यासाठीही वापरलं जातं, पण असं करताना स्वच्छतेची काळजी घ्यावी, नाहीतर जंतूसंसर्ग होऊ शकतो.
नेल कटरसारखं छोटं साधन आपल्या दैनंदिन आयुष्यात किती उपयुक्त आहे, हे या दोन उपकरणांमुळे कळतं. नखं कापणं, त्यांना आकार देणं याबरोबरच आणखी छोट्या-मोठ्या कामांसाठीही ते उपयोगी ठरतं. पुढच्या वेळी नेल कटर हातात घेताना त्यातील या दोन छोट्या चाकूंकडे नीट पाहा. त्यांचा योग्य वापर करून तुम्ही तुमचं काम आणखी सोपं करू शकता.
