पाणी कधी, किती आणि कसे प्यावे? रामदेव बाबांनी दिली माहिती
आयुर्वेदानुसार पाणी हे औषध म्हणून काम करते. पाण्यामुळे शरीराची पचनशक्ती संतुलित राहते. दिवसाच्या कोणत्या वेळी पाणी प्यावे आणि जेवणापूर्वी किंवा नंतर पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे याबाबतचे नियम आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये दिलेले आहेत.

पाणी हे जीवन आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आयुर्वेदानुसार पाणी हे औषध म्हणून देखील काम करते. पाण्यामुळे शरीराची पचनशक्ती संतुलित राहते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यात आणि मन आणि मेंदू शांत ठेवण्यात पाण्याती भूमिका महत्वाची असते. मात्र चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या वेळी, किंवा कमी-जास्त प्रमाणात पाणी पिल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण तहान लागल्यावर लगेच पाणी पितो, पाणी थंड आहे की गरम, जेवणाच्या दरम्यान किंवा जेवणानंतर लगेच विचार न करता पाणी पितो. मात्र आयुर्वेदानुसार या सवयी घातक आहेत. कोणते पाणी प्यावे, पाणी कोणत्या भांड्यात ठेवावे, दिवसाच्या कोणत्या वेळी पाणी प्यावे आणि जेवणापूर्वी किंवा नंतर पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे याबाबतचे नियम आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये दिलेले आहेत. आज आपण बाबा रामदेव यांनी लिहिलेल्या ‘द सायन्स ऑफ आयुर्वेद’ या आयुर्वेदावरील पुस्तकात पाणी पिण्याचे नियम काय आहेत ते जाणून घेऊयात.
कोणते पाणी सर्वात शुद्ध असते?
आयुर्वेदानुसार, पाऊस, झरे किंवा स्वच्छ विहिरीतील पाणी सर्वात शुद्ध असते. हे पाणी हलके, गोड आणि थंड असते, जे शरीरासाठी फायदेशीर ठरते. उन्हात ठेवलेले पाणी (तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात) आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असते. हे पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. आयुर्वेदानुसार दुसऱ्या पावसाचे पाणी सर्वात नैसर्गिक आहे.
केव्हा आणि किती पाणी प्यावे?
आयुर्वेदानुसार योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. जास्त पाणी पिल्याने पचन बिघडू शकते, तर कमी पाणी पिल्यानेही पचनसंस्थेवर परिणाम होतो. पाण्याच्या असंतुलनामुळे मूत्र आणि घाण शरीरातून बाहेर पडत नसेल तर विषासारखे घटक आत जमा होऊ लागतात. यामुळे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. आयुर्वेदानुसार, एकाच वेळी भरपूर पाणी पिण्याऐवजी, हळूहळू वारंवार पाणी प्यावे. यामुळे शरीराला आवश्यक पाणी मिळते आणि पचनसंस्था देखील चांगली राहते. महत्वाची बाब म्हणजे, जेव्हा अन्न पचत नाही तेव्हा पाणी औषधासारखे काम करते आणि जेव्हा अन्न पूर्णपणे पचते तेव्हा पाण्यामुळे शरीराला ताकद मिळते.
जेवताना पाणी पिण्याचे नियम काय आहेत?
आयुर्वेदानुसार, जेवणापूर्वी सुमारे 30 मिनिटे पाणी पिल्याने पचनसंस्था सक्रिय होते त्यामुळे शरीर जेवण्साठी तयार होते. अन्नासोबत जास्त पाणी पिल्यास पाचक रस पातळ होतो, ज्यामुळे अन्न अर्धवट पचले जाऊ शकते. जेवतामा मध्ये थोडे कोमट पाणी पिल्याने पचन होण्यास मदत होते. मात्र जेवणानंतर लगेच पाणी पिणे योग्य मानले जात नाही. यामुळे अपचन, पित्त आणि जडपणा येतो. आयुर्वेदानुसार, जेवणानंतर किमान 45 मिनिटांनी पाणी प्यावे.
थंड पाण्यामुळे शरीराचे नुकसान
उन्हाळ्यात आपण फ्रिजमधील थंड पाणी पितो. मात्र आयुर्वेदानुसार शरीरासाठी ही सर्वात घातक सवय आहे. थंड पाणी शरीराच्या अग्निला शांत करते, यामुळे पचन प्रक्रिया मंदावते. यामुळे अपचन, गॅस, थकवा आणि आळस अशा समस्या येऊ शकतात. थंड पाणी पिण्यामुळे शरीरात जास्त श्लेष्मा निर्माण होतो, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि त्वचेचे आजार वाढू शकतात. जास्त जेवणानंतर लगेच थंड पाणी पिल्यास या समस्या आणखी वाढू शकतात. त्यामुळे कोमट किंवा सामान्य तापमानाचे पाणी पिणे फायदेशीर ठरते.
अशुद्ध पाण्यामुळे गंभीर नुकसान होते
आपल्याला नेहमी स्वच्छ आणि शुद्ध पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. घाणेरडे पाणी अनेक रोगांचे मूळ असू शकते. जर पाण्याचा रंग, चव, वास विचित्र असेल तर ते पाणी पिण्यायोग्य नसते. जर पाणी सूर्यप्रकाशाच्या आणि चंद्रप्रकाशाच्या संपर्कात आले नसेल तर ते पाणी देखील खराब असते. अशा अशुद्ध पाण्यामुळे पोटदुखी, त्वचारोग, बद्धकोष्ठता, पचन समस्या, ऍलर्जी आणि थकवा येऊ शकतो. त्यामुळे हे पाणी पिणे टाळा.
गरम पाणी पिणे फायदेशीर
आयुर्वेदातनुसार गरम पाणी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. कारण गरम पाणी हलके असते, यामुळे पचनक्रिया गतिमान करते. यामुळे अपचन, गॅस, पोट फुगणे, उचकी आणि सर्दी यासारखे आजार दूर करते. जर उकळलेले पाणी पिल्यास वात आणि कफ या आजारांना शांत करते. पाणी अर्धवट उकळून सेवन केले तर ते त्रिदोष (वात, पित्त, कफ) संतुलित करते आणि दमा, खोकला, ताप या आजारांमध्ये फायदेशीर ठरते. रात्री गरम पाणी पिणे फायदेशीर आहे. यामुळे शरीरात गोठलेला कफ वितळतो आणि वात बाहेर पडण्यास मदत होते.
