बुलडाणा लोकसभा : शिवसेनेसमोर बालेकिल्ला राखण्याचं आव्हान

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात होणारी निवडणूक उमेदवार घाटावरचा की घाटा खालचा? यावर अवलंबून असते. या मतदारसंघात कोणत्याही महत्त्वाच्या मुद्यावर निवडणूक न होता नात्या-गोत्यातील मुद्दे अग्रक्रमाने मांडले जातात. शिवाय जातीपातीचं राजकारणही मोठ्या प्रमाणात असतं. 2014 च्या निवडणुकीत युतीचे उमेदवार […]

बुलडाणा लोकसभा : शिवसेनेसमोर बालेकिल्ला राखण्याचं आव्हान
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात होणारी निवडणूक उमेदवार घाटावरचा की घाटा खालचा? यावर अवलंबून असते. या मतदारसंघात कोणत्याही महत्त्वाच्या मुद्यावर निवडणूक न होता नात्या-गोत्यातील मुद्दे अग्रक्रमाने मांडले जातात. शिवाय जातीपातीचं राजकारणही मोठ्या प्रमाणात असतं. 2014 च्या निवडणुकीत युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव मोठ्या फरकाने निवडून आले होते. पण यावेळी चित्र वेगळं असेल.

जिल्ह्यातले महत्त्वाचे प्रश्न

खरं तर बुलडाणा जिल्ह्यात जीगाव सिंचन प्रकल्प अद्यापही अपूर्णच आहे. शेगाव विकास आराखडा सारखाच राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांच्या सिंदखेडराजा विकास आराखडा पूर्ण व्हावा ही सुद्धा एक जिजाऊ भक्तांची महत्त्वाची इच्छा आहे.  जिल्ह्यात सर्वात जास्त अमरावती विभागात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, हाही प्रश्न प्राधान्याचा  आहे. जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयाची सुविधा नाही,  कृषीवर आधारित कोणत्याही प्रक्रिया उद्योग नाही, शेतकऱ्यांची हक्काची बँक म्हणजे जिल्हा सहकारी केंद्रीय बँक ही अवसानात निघालीय. तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित आहेत हे महत्त्वाचे प्रश्न जिल्ह्यामध्ये आज दिसतात.

गेल्या वर्षी नाफेडला विकलेल्या मालाचे अद्यापही चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. पण या प्रश्नांचा विशेष प्रभाव येत्या लोकसभा निवडणुकीत दिसणार नाही. त्याचे कारणही तसेच आहे. निवडणुकीमध्ये उमेदवार हा घाटा खालचा आहे की घाटावरचा आहे? मराठा आहे की अन्य आहे ? याच प्रश्नांच्या अवतीभवती जास्त फिरतो. पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत छोटेमोठे रस्ते जिल्ह्यात झालेले दिसत असले तरी जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, लोणार या तालुक्यातील दुर्गम गावातील रस्त्यांची दुर्दशा कायम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेवरून खासदार दत्तक ग्रामयोजनेअंतर्गत अख्ख्या मतदारसंघातील एक गाव सर्वसोयीयुक्त करण्याचा संकल्प होता. मात्र परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न सातत्याने बाजूला पडतात. विशेष म्हणजे खामगाव-जालना रेल्वे मार्ग हा सुद्धा जिल्ह्याच्या विकासासाठी फार महत्त्वाचा प्रश्न असून 1952 च्या निवडणुकांपासून सातत्याने फक्त निवडणुकीच्या वेळेसच हा विषय चर्चिला जातो. ‌त्यामुळे या प्रश्नांवर जनआंदोलने होताना फारसे दिसत नाही किंवा मग खासदारांकडून याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही.

जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीची युती

जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-शिवसेना अशी लोकसभेची निवडणूक लढली गेली. त्यावेळेस भाजप आणि शिवसेना युतीमध्ये शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हे दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आले. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या पहिली तर 1595435 च्या वर असून जिल्हा परिषदमध्येही सध्या भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचे, तर उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे आहेत. मागील 50 वर्षांच्या काळात जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादीची सत्ता कायम होती. मात्र यावेळी भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेऊन आपली सत्ता काबीज केली. विद्यमान खासदार शिवसेनेचे प्रतापराव जाधव असून 2014 च्या लोकसभा निवडणुकीला ते जवळपास 159579 च्या फरकाने निवडून आले होते. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कृष्णराव इंगळे याना पराभूत केलं होतं.

2009 च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांचा 28 हजार मतांनी पराभव केला होता. तर 2014 ला जाधव यांना 5 लाख 91 हजार 45 मते मिळून त्यांचा विजय झाला. 2014 ला काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार कृष्णराव इंगळे हे माळी समाजाचे होते, तर 2009 ला काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे मराठा समाजाचे होते. पण मराठा समाजामध्ये मतांची विभागणी झाली आणि भाजप शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव हे निवडून आले. प्रतापराव जाधव आणि शिंगणे हे दोन्ही मराठा समाजाचे नेते असले तरी एकमेकांचे नातेवाईक सुद्धा आहेत. या लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचे मतदार हे मोठ्या प्रमाणावर असल्याने लोकसभेमध्ये मराठा उमेदवार हा निवडून येण्याची दाट शक्यता असते.

विद्यमान खासदारांची कामगिरी

शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे मागील 10 वर्षांपासून बुलडाण्याचे खासदार आहेत. तीन जिल्ह्यांना जोडणारा शेगाव रेल्वे उड्डाणपूल केला त्यांनी केला. जीगाव प्रकल्प हा बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये समावेश करून घेतला. शेगाव ते पंढरपूर हा रास्ता गजानन महाराजांच्या पालखीसाठी मंजूर करून घेतला. खडकपूर्णा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करून घेतलं आणि शेगाव रेल्वे स्थानक विकास करायला सुरुवात केली. यासह अनेक विकासकामे केल्याचे ते सांगतात.

विधानसभा मतदारसंघातली समीकरणं

या लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदार संघ येतात आणि जिल्ह्याचा विचार केला तर रावेर मतदारसंघात मलकापूर मतदारसंघ जातो. त्यात खामगाव आणि जळगाव जामोद भाजपकडे, सिंदखेड राजा आणि मेहकर मतदारसंघ शिवसेनेकडे, चिखली आणि बुलडाणा हे मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. म्हणजेच भाजप कडे दोन, शिवसेनेकडे दोन, काँग्रेसकडे दोन मतदारसंघ असून राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार जिह्यात नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात सध्या बॅकफूटवर आहे. तर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सर्वेसर्वा डॉ. राजेंद्र शिंगणे यांना विधानसभेला तिकीट न मिळाल्याने ते सध्या आमदार नाहीत. मात्र जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा त्यांच्याकडेच असून एक सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ सोडला तर राष्ट्रवादी जिल्ह्यात फारशी दिसत नाही. गेल्या वर्षीच्या लोकसभेनंतर मोदी लाट संपूर्ण देशात कायम होती. तरीही या मोदी लाटेत विधानसभा निवडणुकीत दोन उमेदवार काँग्रेसचे निवडून आले.

युती आणि आघाडीच्या राजकारणात काय होणार?

बुलडाणा लोकसभेची ही मूळ जागा काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून फक्त माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडेच पहिलं जातं. नुकतेच काँग्रेस – राष्ट्रवादीची जगावाटप झाल्यावर बुलडाण्यावरुन संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचे नावहीही निश्चित झालंय. मात्र काँग्रेस -राष्ट्रवादी-भारिप-बहुजन महासंघाची आघाडी होईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारिप-बहुजन महासंघाची आघाडी झाल्यास आघाडीपुढे  मोठा पेच निर्माण होऊ शकतो. त्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी वंचित आघाडीकडून डॉ. प्रकाश आंबेडकरांनी बुलडाणा लोकसभेसाठी बाळापूरचे आमदार शिरस्कार यांच्या नावाची घोषणाही करून टाकली आहे. त्यामुळे भारिप अडून बसली तर राष्ट्रवादीमध्ये जागा अदलाबदली करण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.

जिल्ह्यातील मराठा समाजातील उमेदवार म्हणून पहिले तर राजेंद्र शिंगणेच उमेदवार निश्चित आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भारिप-बहुजन महासंघाची आघाडी झालीच तर विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव होऊन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारड्यामध्ये दान पडण्याची दाट शक्यता राहणार आहे.  शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती जर काँग्रेससोबत झालीच, तर या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवीकांत तुपकर यांची मैदानात उतरण्याची पूर्णपणे तयारी झालेली आहे.

खासदार राजू शेट्टींनी ही जागा हक्काची जागा असून आपल्या मुलूख मैदानी तोफेसाठी म्हणजेच रवीकांत तुपकर यांच्यासाठी मनात राखून ठेवली आहे.  रवीकांत तुपकर शेतकरी नेते म्हणून पश्चिम महाराष्ट्रात चांगलेच गाजलेले आहेत आणि ते जरी बाशिंग बांधून असले तरी बुलडाणा लोकसभेमध्ये त्यांची निवडून येण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे आता आघाडी हा पेच कसा सोडवते हे पाहणं गरजेचं असेल.

युती न झाल्यास भाजपकडून कोण?

शिवसेनेकडून प्रतापराव जाधवांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. युती न झाल्यास भाजपच्या वतीने मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती, कृषीमंत्री स्वर्गीय पांडुरंग फुंडकर यांचे सुपुत्र आमदार सागर फुंडकर किंवा भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे हे लोकसभेसाठी आपलं भविष्य भाजपच्या तिकिटावर आजमवणार आहेत. युती आणि आघाडीच्या या काळात स्वतंत्र निवडणुका कोणत्याच पक्षाला नको आहेत, पण जर चुकून स्वतंत्र निवडणुका झाल्याच तर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हे पुन्हा निवडून येण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस -राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्यावरही शेतकऱ्यांची जिल्हा बँक बुडवल्याचा ठपका आहे आणि विरोधक त्याचे भांडवल करतीलच. मात्र मराठा समजातील शांत आणि संयमी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

भारिप आणि एमआयएम गेमचेंजर ठरणार

मुळात बुलढाणा जिल्ह्यात भारिप-बहुजन महासंघाची बऱ्यापैकी ताकत आहे.  काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आणि मुस्लीम मतदानासोबत यांची जर युती झाली तर जिल्ह्यातील जवळपास सात विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भारिप-बहुजन महासंघाचं वर्चस्व दिसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील मलकापूर, खामगाव, जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघात भाजप आणि बुलडाणा, महेकर या मतदारसंघात शिवसेना यांची ताकद आजही मोठ्या प्रमाणात दिसते. परंतु सक्षम उमेदवार या ठिकाणी देण्यात आला, शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाचे जमले तर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची ताकद दिसून येईल.

पक्षातील बंडखोरीची लागण ही जवळपास सर्वच राजकीय पक्षात दिसून येईल.  काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळाले नाही, तर तेही जागा राष्ट्रवादीला निवडून येऊ नये म्हणून प्रयत्न करतील. तसेच शिवसेनेमध्येही यावेळी बंडाळी होण्याची शक्यता आहे. कारण अनेक वर्षांपासून तीच-तीच चेहरे निवडणूक लढवत असल्याने नवीन नेतृत्वाला संधी मिळत नाही याची सुद्धा नाराजी लोकसभेत मतदारसंघात बघावयास मिळेल. काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपाला केंद्रातून आणि राज्यातून मुळापासून दूर करावयाचा संकल्प केला तरच काँग्रेस-राष्ट्रवादीमधील एकोपा टिकण्याची शक्यता आहे.

कोणत्या मतदारसंघात कुणाचा आमदार?

बुलडाणा जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ असून लोकसभेसाठी सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील मलकापूर हा रावेरमध्ये जातो. जिल्ह्यात शिवसेनेचे दोन, भाजपचे तीन, काँग्रेसचे दोन आमदार आहेत. शिवसेनेचे दोन आमदार आणि एक खासदार आहे. घाटावर प्रभाव जास्त मात्र, घाटाखाली कमी आहे. शिवसेनेला दोन जिल्हाप्रमुख असतात. घाटावरील जालिंदर बुधवंत आणि घाटाखाली शांताराम दाणे आहेत.

शिवसेनेचे आमदार – संजय रायमूलकर – मेहकर आणि डॉ शशिकांत खेडेकर – सिंदखेडराजा.

भाजपचे आमदार – आकाश फुंडकर, खामगाव आणि डॉ. संजय कुटे – जळगाव जामोद .. ( चैनसुख संचेती – मलकापूर )

काँग्रेसचे आमदार – हर्षवर्धन सपकाळ – बुलडाणा आणि राहुल बोन्द्रे – चिखली

शिवसेना बालेकिल्ला अबाधित ठेवणार?

जिल्ह्यात शिवसेना 80 च्या दशकाच्या शेवटच्या वर्षांमध्ये आली. मेहकरचे रहाटे आणि बुलडाण्याच्या पवार आणि कोरके यांनी शिवसेना बुलडाण्यात आणली. त्यानंतर विजयराज शिंदे, संजय गायकवाड, विठ्ठल लोखंडकार, प्रा. नरेंद्र खेडेकर, बलदेव चोपडे यांनी शिवसेना जिल्ह्यात वाढवली. माजी मंत्री डॉ. राजेंद्र गोडे हे नंतर शिवसेनेत आले. 1995 च्या निवडणुकीत विजयराज शिंदे बुलडाणा आणि प्रतापराव जाधव हे मेहकरचे आमदार झाले. त्यानंतर 1999 ला पुन्हा जाधव आमदार झाले तर शिंदे पराभूत. नंतर 2009 आणि 2014 मध्ये जाधव खासदार झाले. 1996 ला आनंदराव अडसूळ खासदार झाले. 1998 ला पराभूत तर 1999 ला अडसूळ पुन्हा विजयी झाले. 2004 साली पुन्हा अडसूळ निवडून आले. त्यानंतर च्या निवडणुकीत अडसूळ अमरावतीला गेले. 2009 मध्ये खासदार प्रतापराव यांना तिकीट मिळाल्याने ते खासदार झाले. पुन्हा 2014 मध्ये खासदार झाले. परंतु आता सध्या गटातटच्या राजकारणामुळे शिवसेनेचं वातावरण जिल्ह्यात आता कमी होऊ लागलंय. मात्र उमेदवाराच्या दृष्टीने विचार केला तर लोकसभेसाठी वैयक्तिकरित्या कोणीही कोणाला फारसा विरोध करत नाही. उमेदवार पाहून त्याला मतदान केलं जाईल अशी परिस्थिती आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.