लातूर लोकसभा : इच्छुकांची गर्दी, भाजपला बंडखोरीचा धोका

लातूर लोकसभा : इच्छुकांची गर्दी, भाजपला बंडखोरीचा धोका

लातूर : लोकसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झालंय. टीव्ही 9 मराठी याच पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. लातूर राखीव लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे डॉ. सुनिल गायकवाड हे खासदार आहेत. मोदी लाटेत त्यांनाही चांगलेच मताधिक्य लाभले होते. जवळपास दोन लाख मतांनी ते 2014 च्या निवडणुकीत विजयी झाले. त्या अगोदर 2009 च्या  लोकसभा निवडणुकीत ते भाजपाच्या उमेदवारीवर पराभूत झाले होते. मोदी लाट येण्याअगोदर या मतदारसंघावर तसे काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहे. विलासरावांनी तर जयवंत आवळेंना ऐनवेळी लातूरला बोलावून खासदार म्हणून निवडून आणलं होतं. त्या अगोदर येथून भाजपाच्या रूपाताई निलंगेकर यांचा अपवाद वगळता काँग्रेसचे शिवराज पाटील चाकूरकर हे या मतदारसंघाचे बरेच वर्षे प्रतिनिधित्व करत होते.

मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे

गेल्या पाच वर्षात लातूर लोकसभा मतदारसंघातल्या 12 तालुक्यात नैसर्गिक, सामाजिक आणि औद्योगिक परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आपोआपच राजकारणावरही दिसतो. पाणी टंचाई, दुष्काळ, रेल्वेचं विस्तारीकरण, संथ झालेले व्यवसाय यामुळे लोकांमध्ये मोदी सरकारबद्दल नाराजी आहे. लातूर-मुंबई एक्स्प्रेस ही रेल्वे म्हणजे लातूरकरांच्या जिवाभावाचा विषय. ही गाडी पुढे कुठेही पाठवू नये, या उलट ज्यादा रेल्वेगाड्या लातूरहून पुण्या-मुंबईकडे सुरु कराव्यात हा लोकांचा आग्रह होता. तरी लातूर-मुंबई रेल्वे बिदरपर्यंत विस्तारित करण्यात आली. त्यामुळे लातूरकर नाराज झाले. या रेल्वेसाठी मोठं आंदोलनही लातूरकरांनी केलं. खासदार फंडातून कामे मिळावे यासाठी असंख्य कार्यकर्ते सुनिल गायकवाडांच्या संपर्कात होते. मात्र त्यांना कामे मिळाली नाहीत. कदाचित म्हणूनच विद्यमान खासदारांचा पाठिंबाही कमी झाल्याचं दिसतंय.

इच्छुकांची गर्दी आणि बंडखोरीचा धोका

दुसरीकडे सुधाकर शृंगारे या व्यवसायीकाने लातूरच्या राजकरणात चांगलेच पाय पसरले आहेत. ते त्यांचं मूळ गाव असलेल्या नळेगाव जवळच्या वडवळमधून सध्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. भाजपात त्यांनी पालकमंत्री, आमदार ते पदाधिकारी असं सर्वांशी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून जमवून घेतलंय. वर्तमानपत्रातून  नित्यनियमाने ठरलेल्या त्यांच्या जाहिराती, अगदी बैल पोळा सणालाही झळकत आहेत. लोकांमध्ये जाण्यासाठी शृंगारे यांनी अमाप खर्च चालवला आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी ते वाट्टेल ती किंमत मोजायला मागे-पुढे पाहणार नाहीत.

लोकसभेच्या उमेदवारीसाठी ते निलंगा, अहमदपूर आणि उदगीर विधानसभा मतदारसंघाचा खर्चही ऐनवेळी उचलू शकतात, अशी चर्चा लोक का करतायत हे कळत नाही. उदगीरचे भाजप आमदार सुधाकर भालेराव हे लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. सांगताना ते आता माझा मंत्री पदावर दावा आहे, त्यामुळे मी लोकसभा कशाला लढवू असे सांगत असले तरी जिह्यातल्या राजकारणाला कंटाळून ते लोकसभेची वाट धरू शकतात. तर लातूर मतदारसंघ राखीव असल्याने युतीमधून हा मतदारसंघ आरपीआय आठवले गटाला सोडावा अशी मागणी चंद्रकांत चिकटे यांनी केलेली आहे.

काँग्रेसची आतापासूनच चाचपणी सुरु

जिल्ह्यातल्या असंख्य प्रश्नांवर रान उठवणाऱ्या काँग्रेसनेही आता उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. काँग्रेसने लातूर, मुंबई आणि पुन्हा लातूरमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. जवळपास 50 जणांनी काँग्रेसकडे लोकसभेसाठी उमेदवारी मागितली. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. लक्ष्मण कांबळे, हणमंत सिरसाठ, विनोद खटके, शिवाजी जवळगेकर, संजय ओहळ, बाबासाहेब गायकवाड, भाई नगराळे अशा अनेकांनी मुलाखती दिल्या आहेत.

भाजपपेक्षा यावेळी काँग्रेसकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. काँग्रेसची नेतेमंडळी मात्र आमदार अमित देशमुख ठरवतील तो उमेदवार, अशा भावनेत पुढे जात आहे. काँग्रेस आणखीही उमेदवाराच्या शोधात आहे. ऐनवेळी जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेही लातूरचे उमेदवार होऊ शकतील अशी चर्चा आहे. मात्र शिंदे सोलापूर सोडून इकडे थांबण्याचं धाडस करतील असं वाटत नाही. काँग्रेसचा उमेदवार हा ऐनवेळीच ठरेल हे मात्र खरं. भाजपने डॉ. सुनिल गायकवाड यांनाच उमेदवारी दिल्यास दुसरे इच्छुक उमेदवार सुधाकर शृंगारे हे काँग्रेसकडून निवडणूक लढवू शकतात, तर सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिल्यास विद्यमान खासदार गायकवाड हे काँग्रेसकडून लढू शकतात हे नाकारता येणार नाही.  शृंगारे यांना  उमेदवारी मिळावी यासाठी पालकमंत्री संभाजी निलंगेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी पीए अभिमन्यू पवार, आमदार विनायकराव जाधव हे प्रयत्न करू शकतात. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार सुनिल गायकवाड यांचे बंधू इंजिनीअर अनिल गायकवाड यांचे स्नेह संबंध चांगले  असल्याने सुनिल गायकवाड यांनाच तिकीट मिळेल असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

भारिप-एमआयएम निर्णयाक ठरणार

भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएम आघाडीनेही लातूरच्या राजकरणात भाजपा, काँग्रेसची चांगलीच दमछाक केलेली आहे. लातूर, उदगीर शहर आणि जिल्ह्यात आंबेडकरी समुदायाचा टक्का मोठा आहे. त्यामुळे चाय-पे चर्चा करणाऱ्यांना हादरा देण्याची ताकद लातूरच्या राजकारणात भारिपने  निर्माण केली आहे. इतर पक्षांचं फारसे वर्चस्व या मतदारसंघात नाही. नांदेड जिल्ह्यातले लोहा आणि कंधार हे दोन तालुके या मतदारसंघात समाविष्ट आहेत. लातूरपासून दूर असलेले हे तालुके कोणताही खासदार आम्हाला न्याय देत नाही, ही भावना इथल्या लोकांमध्ये आहे. तर यावर्षी झालेला अल्प पाऊस शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा ठरला आहे. मागणी करूनही दुष्काळ जाहीर न झाल्याने शेतकरी येणाऱ्या निवडणुकीत काय भूमिका घेतील हे सांगता येणार नाही.

आगामी निवडणुकीसाठी भाजपाकडे बूथ प्रतिनिधी, प्रचार यंत्रणा, व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी तयार असल्याचं चित्र आहे. तर काँग्रेसकडे एवढी तगडी यंत्रणा नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीत येणारे पक्ष-संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते यांची सांगड कशी घातली जाईल आणि ते आपल्या उमेदवाराचा विजय व्हावा यासाठी एकजीवाने राबतील का हे पाहावे लागेल. तरीही काँग्रेस या निवडुकीला सामान्य लोकांच्या प्रश्नावरच्या चळवळीचं स्वरूप देऊ पाहते आहे. त्यासाठी लोकामंध्ये सहज मान्य होईल असा सामान्य चेहरा शोधण्याचं काम सुरु आहे. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी दोन्ही बाजूने काही पत्रकार उमेदवारांनीही  आपल्या बाह्या सावरल्या आहेत. त्यामुळे इथे कोण लढेल आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल हे आत्ताच सांगता येणं कठीण आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI