दक्षिण मुंबई लोकसभा : भाजपच्या मदतीशिवाय शिवसेना जागा राखणार?

दक्षिण मुंबई लोकसभा : भाजपच्या मदतीशिवाय शिवसेना जागा राखणार?

मुंबई : लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. याच पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठी राज्यभरातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. दक्षिण मुंबई हा मुंबईतला अत्यंत उच्चशिक्षित आणि हायप्रोफाईल मतदारसंघ मानला जातो. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेने इथे अरविंद सावंत यांच्यासारखा नवखा उमेदवार दिल्याने मॅच फिक्सिंग झाल्याची चर्चा होती. पण मोदी लाटेवर स्वार होत अरविंद सावंत इथून विजयी झाले आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ काँग्रेसकडून शिवसेनेकडे गेला. काँग्रेसचा बालेकिल्ला यासाठी, कारण इथून काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा तब्बल तीन वेळा निवडून गेले होते. त्यानंतर देवरा यांचा मुलगा आणि राहुल गांधी यांचे विश्वासू मानले जाणारे मिलिंद देवरा दोन वेळा खासदार झाले. पण अरविंद सावंत यांनी त्यांची हट्ट्रिक पूर्ण होऊ दिली नाही.

2014 च्या निवडणुकीत मोदींना पसंती देत लोकांनी शिवसेनेच्या उमेदवाराला भरभरून मतदान केलं. शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना 3 लाख 74 हजार 609, तर काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना 246045 मतं मिळाली होती. मनसेच्या बाळा नांदगावकर यांना 84733 आणि आपच्या मीरा संन्याल यांना 40298 मते मिळाली. या निवडणुकीत अरविंद सावंत यांनी तब्बल सव्वा लाख मतांची आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं.

2019 च्या निवडणुकीत मात्र पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय. ज्या मोदी लाटेची चर्चा पहिल्या तीन वर्षापर्यंत होती ती आता ओसरल्याचं दिसून येतंय. त्याशिवाय शिवसेना-भाजपमधला बेबनाव स्पष्टपणे जाणवत असल्याने मुळात शिवसेनेची जागा असली तरी ती टिकवून ठेवणं शिवसेनेला भाजपच्या मदतीशिवाय शक्य नाही. शिवसेना-भाजपच्या या वादाचा फायदा दक्षिण मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना झाल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेकडून अरविंद सावंत यांनाच पुन्हा तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसकडून मिलिंद देवराच उमेदवार या मतदारसंघात आहेत. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने भाजपचा उमेदवार या मतदारसंघात अजून ठरलेला दिसत नाही.

दक्षिण मुंबई मतदारसंघात हायप्रोफाईल आणि व्यापारी, उद्योजकांचं वास्तव्य असल्याने या मतदारसंघाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे इथल्या मतदारांचं गणित वेगळं आहे. असं असलं तरीही चिराबाजार, ठाकूरद्वार, गिरगाव, कुंभारवाडा या भागात मराठी वस्ती जास्त असल्याने शिवसेनेचं प्राबल्य चांगलं आहे. तसंच या मतदारसंघातला एकेकाळी अस्सल मराठमोळा भाग असलेलं गिरगाव यावेळी कोणाच्या बाजूने उभं राहतं हे महत्त्वाचं असणार आहे. कारण मेट्रो प्रकल्पावरुन गिरगाववासियांनी मोठा लढा दिला होता. त्याला शिवसेनेने चांगली हवा दिली होती.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, वरळी, भायखळा, शिवडी विधानसभा मतदारसंघ येतात. या सहा मतदारसंघापैकी कुलाब्यात राज पुरोहित, मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोढा हे भाजपचे आमदार आहेत. तर वरळीत सुनील शिंदे आणि शिवडीमध्ये अजय चौधरी हे शिवसेनेचे आमदार आहेत. मुंबादेवीमध्ये काँग्रेसचे अमिन पटेल तर भायखळ्यामध्ये एएमआयएमचे वारिस पठाण आमदार आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय आमदार असल्याचं पाहायला मिळतं. येत्या निवडणुकीत कुठला उमेदवार या भौगोलिक आणि मतदारांच्या विविधतेवर कशी मात करतो तोच विजयी ठरु शकेल.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI