दावोसच्या तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत एमएमआरडीएचे 26 अब्ज डॉलर्सचे सामंजस्य करार
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या २०२६च्या वार्षिक बैठकीच्या तिसऱ्या दिवशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनेक महत्त्वाचे करार झाले आहेत.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या २०२६च्या वार्षिक बैठकीच्या तिसऱ्या दिवशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दोन ऐतिहासिक गुंतवणूक सामंजस्य करारांवर औपचारिकरित्या शिक्कामोर्तब केले आहे. या करारांमुळे भविष्याभिमुख आणि एकात्मिक आर्थिक परिसंस्थांच्या दिशेने एमएमआरडीएच्या विकास धोरणात निर्णायक वळण नोंदवले गेले आहे.
या सामंजस्य करारांमध्ये एआयवर आधारित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील भागीदारीचा टाटा समूहासोबत केलेला ११ अब्ज डॉलर्सचा करार समाविष्ट असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मोठ्या प्रमाणावर इनोव्हेशन सिटी उभारण्याचा त्यामध्ये समावेश आहे. यासोबतच भारत–स्वित्झर्लंड (बी-स्विस-एमएमआर) सहकार्याअंतर्गत १५ अब्ज डॉलर्सचा शाश्वत औद्योगिक विकास उपक्रम राबवण्यात येणार आहे. या दोन्ही भागीदाऱ्यांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रगत उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत औद्योगिक वाढीसाठी जागतिक स्तरावर सक्षम केंद्र म्हणून पुढे येईल.
डब्ल्यूईएफ 2026 मध्ये निश्चित करण्यात आलेल्या 226.65 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणूक प्रतिबद्धता या पूर्णतः यावर्षी करण्यात आलेल्या सामंजस्य करारांशी संबंधित असून, मागील वर्षी डब्ल्यूईएफमध्ये एमएमआरडीएद्वारे उभारण्यात आलेल्या 40 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीच्या तुलनेत ही लक्षणीय वाढ दर्शवते. या यशासह, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका सत्रात कोणत्याही अर्धशासकीय संस्थेद्वारे आतापर्यंत साध्य करण्यात आलेली ही सर्वाधिक गुंतवणूक प्रतिबद्धता असून, प्राधिकरणाच्या दूरदृष्टी आणि अंमलबजावणी क्षमतेवर जागतिक स्तरावर व्यक्त झालेल्या अभूतपूर्व विश्वास दर्शवतो. एकूण 24 सामंजस्य करारांद्वारे (13 गुंतवणूक व 11 धोरणात्मक भागीदारी) ही गुंतवणूक निश्चित करण्यात आली असून, एमएमआरडीएच्या 51 वर्षांच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक उभारणी आहे..
या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्र आज भारताच्या पुढील आर्थिक परिवर्तनाच्या टप्यात अग्रस्थानी आहे. टाटा समूहासोबतच्या धोरणात्मक भागीदारीद्वारे आम्ही ११ अब्ज अमेरिकी डॉलरची कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पायाभूत गुंतवणूक निश्चित करत असून, यामुळे नवोन्मेष व डिजिटल क्षमतांना गती मिळेल. भारत-स्वित्झर्लंड सहकार्यामुळे मुंबई महानगर प्रदेशात जागतिक दर्जाच्या शाश्वत औद्योगिक विकास पद्धती अमलात येतील. ही २६ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक केवळ भौतिक साधनांमध्येच नाही, तर राज्यातील युवक, अर्थव्यवस्था आणि महाराष्ट्राच्या जागतिक ग्रोथ इंजिन भूमिकेमधील दीर्घकालीन गुंतवणूक आहे.”
तर उपमुख्यमंत्री आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे याबाबत बोलताना म्हणाले की “दावोस येथे झालेल्या या भागीदाऱ्यांमधून महाराष्ट्रावर आणि मुंबई महानगर प्रदेशाचा नव्याने विकास घडवण्याच्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या व्हिजनला जागतिक स्तरावर असलेला मजबूत विश्वास अधोरेखित होतो. स्वित्झर्लंडमधील नवोपक्रम, हरित तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा यांचे एकत्रीकरण करून, माणसाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या स्मार्ट औद्योगिक परिसंस्था आम्ही उभारत आहोत. या गुंतवणुकीमुळे नव्या विकास क्षेत्रांना चालना मिळेल, दर्जेदार रोजगार संधी निर्माण होतील आणि राज्यासाठी आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम, भविष्यसज्ज अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल.”
