Eknath shinde:मविआ सरकार संकटात आल्यानंतर मंत्रालयात पळापळ, आमदारांना 319 कोटी रुपयांचे वितरण, तर दोन दिवसांत निघाले 106 जीआर
सरकार अस्थिर झाल्यानंतर खरी पळापळ ही मंत्रालयात सुरु झाली आहे. अनेक मंत्र्यांच्या खात्यातील राहिलेले शासन निर्णय तातडीने जारी करण्यात यावेत, यासाठी मंत्र्यांकडूनच दबाव येत असल्याचे सांगण्यात येते आहे. तसेच अर्थ खात्यातूनही पैसे वितरणाला गती आल्याचे सांगण्यात येते आहे.

मुबंई – एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी पुकारलेल्या बंडानंतर आणि सुमारे 45 आमदार हे शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे यांच्या बंडानंतर,आता सरकार अस्थिर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)यांनीही बुधवारी बंडखोरांना भावनिक आवाहन करत, वर्षा निवासस्थानावरुन आपला मुक्काम मातोश्री या निवासस्थानी हलवला आहे. सरकार अस्थिर झाल्यानंतर खरी पळापळ ही मंत्रालयात (Mantralay)सुरु झाली आहे. अनेक मंत्र्यांच्या खात्यातील राहिलेले शासन निर्णय तातडीने जारी करण्यात यावेत, यासाठी मंत्र्यांकडूनच दबाव येत असल्याचे सांगण्यात येते आहे. तसेच अर्थ खात्यातूनही पैसे वितरणाला गती आल्याचे सांगण्यात येते आहे.
अर्थ खात्यातूनही 319 कोटी रुपयांचा निधी आमदारांना
अजित पवारांच्या अर्थ, नियोजन विभागानेही आमदारांना स्थानिक विकास कार्यक्रमाचा 319 कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या जिल्ह्यांना सर्वाधिक निधी मिळाला असल्याची माहिती आहे. या सर्व आमदारांना 1770 कोटी मिळणे अपेक्षित होते, त्यातील 319 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. 287 विधानसभा सदस्यांना प्रत्येकी 92 लाख रुपये देण्यात आले आहेत. अशी माहिती आहे.
दर नवव्या मिनिटाला निघतोय एक जीआर
मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवसांचा विचार केला तर, मंत्रालयातून, 106 जीआर काढण्यात आले आहेत. यातील सर्वाधिक जीआर हे पाणीपुरवठा आणि जलसंधारण विभागाचे आहेत. एका दिवसाच्या कामाचे आठ तास लक्षात घेतले तर दर नवव्या मिनिटाला एक जीआर काढण्यात आला आहे. मंत्री शंकरराव गडाख यांच्या मृदू आणि जलसंधारण खात्यातून, 2दिवसांत 23 जीआर काढण्यात आले आहेत.हे सर्व जीआर कोल्हापुरी आणि सिमेंट बंधाऱ्यांच्या किमती वाढवणारे आहेत. या किमती दीडपटाने वाढवणार आहेत.
शिंदे यांच्या बडाचे पुढे काय होणार याची उत्सुकता
एकनाथ शिंदे हे सध्या शिवसेना आणि अपक्ष आमदार हे सध्या गुवाहाटीला आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे सुमारे ४६ आमदार असल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र आता यापुढे स्वतंत्र गट स्थापन करणे, राज्यात विधानसभेत प्रत्यक्ष विश्वासदर्शक ठराव जिंकेपर्यंत हे सगळे जिकिरीचे ठरणार आहे. त्यातच शिंदे यांचा फुटलेला गट हाच शिवसेना असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांना धनुष्य बाण चिन्ह मिळवण्यासाठी अजून बरेच प्रयत्न शिंदे समर्थकांना करावे लागणार आहेत. या आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी प्रत्यक्ष येऊन चर्चा करावी, त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. मुख्यमंत्री बॅकफूट गेल्याचे या वक्तव्याने मानण्यात येते आहे. आता एकनाथ शिंदे याला काय उत्तर देणार, की थेट राज्यपालांकडे स्वतंत्र गटाचे पत्रच सादर करणार, यावर पुढचे राजकारण अवलंबून असणार आहे.
