आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली कटू आठवण, म्हणाले माझ्या वडिलांना तुरुंगात..
देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या लेखाने १९७५ च्या आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा आणीबाणीतील अनुभव सांगितला आहे, ज्यामध्ये त्यांच्या वडिलांची अटक झाली होती.

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. इंदिरा गांधी यांच्या या निर्णयाला आज ५० वर्ष पूर्ण झाले. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वर्तमानपत्रामध्ये आणीबाणीच्या मुद्द्यावर लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी आणीबाणीवर टीका करत काही जुन्या कटू आठवणी सांगितल्या आहेत. देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला आज ५० वर्षे झाली. त्याला सुवर्ण महोत्सव म्हणायचे तरी कसे? महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो. त्यामुळे संविधान आणि सांविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेस पक्षाने लिहिलेल्या या अध्यायाला ५० वर्षं झाली, एवढेच म्हणावे लागेल. जुने दिवस कधी विसरायचे नसतात, ते सतत आपल्याला लढण्याचे बळ देत असतात, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.
देवेंद्र फडणवीसांनी आणीबाणीवर लिहिलेल्या लेखातील महत्त्वाचे मुद्दे
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना त्यांचा विचार कधी काँग्रेसने स्वीकारला नाही आणि आणीबाणीत तर त्यांनी दिलेल्या पवित्र संविधानावरच सूड उगवण्याची भूमिका घेतली. तीन लाखांवर लोकांना तुरुंगात टाकण्यात आले होते, अनेक संसार उघड्यावर आले होते. समाजवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघ या आंदोलनात अग्रणी होते. या आणीबाणीच्या समर्थनार्थ केवळ दोनच पक्ष उभे झाले, त्यातील एक होती भाकप आणि दुसरी शिवसेना. माकपनेसुद्धा विरोधी भूमिका घेतली होती. या आणीबाणीने अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. घरातील कमावती व्यक्ती कारागृहात असताना अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. अनेकांची संपत्ती जप्त झाली, उद्याोग-रोजगार कायमचे संपुष्टात आले. मानसिक आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर मोठे शोषण झाले. माझा वैयक्तिक अनुभव विचाराल, तर मी केवळ पाच वर्षांचा होतो. माझे वडील दि. गंगाधरराव फडणवीस यांनाही अटक झाली होती. त्यांना कारागृहात डबा द्यायला जाताना किंवा त्यांना वैद्याकीय तपासणीसाठी नेताना फक्त भेट होत असे. लहान वयात वडिलांपासून बराच काळ दूर राहावे लागले. त्यामुळे मनातून चीड होती, अशी कटू आठवण देवेंद्र फडणवीसांनी सांगितली.
आज ऑपरेशन सिंदूरनंतर काँग्रेसने जी भूमिका घेतली, त्याची त्यांना लाज वाटली पाहिजे. खरे तर आणीबाणीच्या काही काळ आधी पाकिस्तानशी युद्ध झाले होते. त्यावेळी जनसंघ म्हणून इंदिरा गांधींच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा अटलबिहारी वाजपेयी यांनी केली. आणीबाणी उठविल्यावर पुन्हा रामलीला मैदानावर जंगी सभा झाली. इंदिरा गांधी मुर्दाबाद, अटलबिहारी वाजपेयी जिंदाबाद, अशा घोषणा निनादल्या. अटलजींनी तो जमाव शांत केला. आणीबाणीनंतर विधिपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका या व्यवस्थांचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले होते. लोकशाहीचे महत्त्व काय, हे अधिक प्रकर्षाने लोकांना समजले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संविधानावरील श्रद्धा अधिक दृढ झाली. त्या नेत्यांनी संघर्ष केला नसता, तर कदाचित आपल्या देशातसुद्धा हुकूमशाही प्रस्थापित झाली असती. आज जी अवस्था पाकिस्तानची आहे, तीच भारताचीही झाली असती. आज जी लोकशाही जिवंत आहे, ती ५० वर्षांपूर्वी संघर्ष केलेल्या त्या नेत्यांमुळे. आज आणीबाणीपेक्षाही त्या नेत्यांचे स्मरण अधिक आवश्यक आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
गांधी घराणे आणि काँग्रेसने केलेल्या शोषणाच्या कथा जितक्या प्रकर्षाने पुढे येतील, त्यातून लोकशाही अधिक भक्कम होत जाईल. आज आम्ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणीबाणीच्या या विदारक कथा चित्ररूपाने प्रदर्शनातून मांडत आहोत. प्रत्येकाने त्याला अवश्य भेट द्यावी. आणीबाणीत संघर्ष करणाऱ्या कुटुंबांनी, लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी जो लढा दिला, त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरवसुद्धा करणार आहोत. त्या कुटुंबांना मानधन देण्याचा निर्णयसुद्धा राज्य सरकारने घेतला आहे. हे आम्ही लोकशाही रक्षणाच्या मंदिरात वाहिलेले पवित्र पुष्प आहे. येणाऱ्या पिढ्यांनी मात्र हा इतिहास आवर्जून समजून घेतला पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
