ही आणीबाणीची परिस्थिती; मतदार यादीवरून आदित्य ठाकरे आक्रमक, आकडेवारी सांगत म्हणाले, 2029 आधी..
आदित्य ठाकरेंनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि आयोगावर हल्लाबोल केला. त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आकडेवारीतील घोळावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

देशामध्ये विरोधकांकडून देशाच्या निवडणूक आयोगाबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एसआयआर प्रक्रियेत घोळ करुन निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीला मदत करतोय, असा गंभीर आरोप काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या घटक पक्षांकडून केला जात आहे. त्यावरुनच निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांचा ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मागितला जात आहे. त्यासाठी दिल्लीमध्ये गेली तीन दिवस वातावरण तापलेलं होतं आता आदित्य ठाकरेंनीही निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे.
आदित्य ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगावर टीका केली आहे. यादीतील मतदारांची नावे गेली कुठे, असं म्हणत त्यांनी थेट आकडेवारीच सांगितली आहे. ते म्हणाले की, गोलमाल ग्यानुचा पहिला गोलमाल सांगतो. 7 लाख 90 हजारांची आकड्यात गोलमाल आहे. मे मध्ये एक आकडा निवडणुक आयोगाने दिला तर ऑगस्टमध्ये वेगळाच आकडा दिला. हे मतदार गेले कुठे हे गोलमाल ग्यानुने सांगावं. 5 लाख मतदार गेले कुठे हे त्यांनी सांगावं.
भिवंडी मतदार संघात 3 लाखाहुन अधिक मतदार आहेत. SIR आणि मतदार यादीचा ताळमेळ बसत नाही. मग ते मतदार गेले कुठे? एवढी तफावत झाली कशी? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे. माहीम मतदार संघात एक बूथ असा आहे की 2002 च्या SIR मध्ये नाव आहे. त्यांनी 2002 पासून ते मतदान करतात, पण निवडणुक आयोगाच्या ड्राफ्ट रोलमध्ये नाव असताना देखील त्यांना आता नोटीस गेल्या आहेत. हा काय प्रकार आहे, असा सवाल आदित्य यांनी उपस्थित केला आहे.
2029 आधीच सरकार बदलणार अशी परिस्थिती
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, अनेक ठिकाणी BLO घरी गेले असतील असं वाटत नाही.अनेक ठिकाणी तर BLO जायचे आणि आजूबाजूवाल्याना बोलवून घेतले तिथे काम केले. आमच मुख्य टार्गेट हे गोलमाल ग्यानु आहे त्यांना हटवावं लागेल. आता ही लढाई रस्त्यावरची आहे. आताची स्थिती आणीबाणीची परिस्थिती आहे. गोवा, राजस्थान येथून अनेक ट्रेनमध्ये मुलांना उचलल जातंय. परिस्थिती अशी आहे की 2029 च्या अगोदर सरकार बदलेलं.
