मोठी बातमी! मणिकराव कोकाटेंनंतर रोहित पवारांकडून आता आणखी एका मंत्र्यांचा व्हिडीओ पोस्ट
मोठी बातमी समोर येत आहे, रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता, त्यानंतर त्यांनी आता आणखी एका मंत्र्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमुळे माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले. राज्यभरात वातावरण तापलं. विरोधकांकडून सातत्यानं माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू होती. या व्हिडीओवरून विरोधकांनी सरकारची चांगलीच कोंडी केली.
या व्हिडीओनंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात आला नाही तर त्यांच्याकडे असलेलं खातं बदलण्यात आलं आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेलं कृषी खातं हे अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे दत्तात्रय भरणे यांना देण्यात आलं तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे युवक आणि क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.
दरम्यान या व्हिडीओनंतर आता रोहित पवार यांनी राज्यमंत्री मेघना बर्डीकर यांचा एक व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. ‘याद राख, मेघना बोर्डिीकरचा शब्द आहे, खानाखाली घालील आता, आत्ताच्या आत्ता बडतर्फ करुन टाकेल,’ असा इशारा या व्हिडीओमधून देण्यात आला आहे.
सभागृहात रम्मी खेळणारे… पैशांच्या बॅगा भरणारे… डान्सबार चालवणारे… आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे.. यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची…
सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट… pic.twitter.com/rRMbQsPHde
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 2, 2025
हा व्हिडीओ पोस्ट करताना रोहित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘सभागृहात रम्मी खेळणारे… पैशांच्या बॅगा भरणारे… डान्सबार चालवणारे… आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे.. यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची… सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात? देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे. कृपया यांना आवरा..!’ असं कॅप्शन या व्हिडीओला रोहित पवार यांनी दिलं आहे.
