
काही दिवसांपूर्वीच राज्यात महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं, भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला, राज्यातील काही महापालिकांमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता आली, तर काही महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीची सत्ता आली, तर दुसरीकडे भाजपनंतर राज्यात शिवसेना शिंदे गटाला यश मिळालं. या निवडणुकीच्या निकालांमध्ये शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष ठरला आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षाला या महापालिका निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. महापालिका निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेस हा तिसऱ्या क्रमाकांचा पक्ष ठरला आहे. दोन्ही राष्ट्रवादी, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच शिवसेना ठाकरे गट व मनसे यांना या निवडणुकीत मोठा दणका बसला.
दरम्यान महापालिका निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश मिळालं, काँग्रेस हा राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. मात्र महापालिका निवडणुकीनंतर आता काँग्रेसमध्ये फूट पडताना दिसून येत आहे, चंद्रपूरमधून मोठी बातमी समोर येत आहे. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता आहे. 13 नगरसेवकांना घेऊन खासदार प्रतिभा धानोरकर या नागपूर विभागीय कार्यालयात पोहोचल्या आहेत. चंद्रपूर महापालिकेसाठी प्रतिभा धानोरकर या वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यामधील वाद आता समोर आला आहे. यापूर्वी देखील विजय वडेट्टीवार हे नगरसेवक घेऊन गेल्याचा आरोप धानोरकर यांनी केला होता. यावर स्पष्टीकरण देताना आमच्यामध्ये संवाद झाला असून, आता कोणताही वाद नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.
मात्र अजूनही हा वाद मिटला नसल्याचं दिसून येत आहे, आता काँग्रेसचे 13 नगरसेवक घेऊन धानोरकर थेट नागपूर विभागीय कार्यालयात पोहोचल्या आहेत, त्या चंद्रपूर महापालिकेसाठी नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. दरम्यान यावर आता काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.