महाराष्ट्राने पुन्हा एकदा एक कर्तबगार आणि खंबीर नेता गमावला, सामनातून हळहळ व्यक्त
अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघातातील निधनाने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. सामना अग्रलेखातून त्यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेत राज्याची ही मोठी हानी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. आपल्या रोखठोक शैलीने आणि प्रशासकीय पकडीने राजकारण व्यापून टाकणारे दादा म्हणजेच अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अकाली निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. अजित पवार हे दादाच होते. हे दादा पर्व अकाली संपले. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, आर. आर. पाटील अशी उमदी व तरुण मंडळी महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणातून निघून गेली. जणू महाराष्ट्राच्या मराठी राजकारणाला कोणाची दृष्टच लागली. राज्याच्या राजकीय क्षितिजावरील एक कर्तबगार तारा निखळला, अशी भावना सामना अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून अजित पवारांच्या अकाली निधनावर भाष्य करण्यात आले आहे. अजित पवार हे त्यातील एक. शरद पवार यांच्या सावलीतही त्यांनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले. पण मृत्यू अविचारी बनला व त्याने महाराष्ट्राचे हे उमदे आणि दिलदार नेतृत्व आपल्यातून हिरावून नेले. अजितदादांच्या पायाला भिंगरीच होती व ते सतत फिरत आणि दौऱ्यावर असायचे. आता ते अशा दौऱ्यावर गेले की पुन्हा परत येणार नाहीत, असे सामना अग्रलेखातून म्हटले.
त्यापूर्वीच नियतीने हा घात
काकांचे पुतणे ते स्वतंत्र नेतृत्व शरद पवारांच्या सावलीत वाढूनही अजितदादांनी स्वतःचे स्वतंत्र वलय निर्माण केले. काटेवाडीचा कार्यकर्ता ते राज्याचा उपमुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. जरी त्यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील ४० आमदार घेऊन भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला असला, तरी शरद पवारांशी असलेली त्यांची कौटुंबिक नाळ कधीच तुटली नाही. आगामी निवडणुका ते पुन्हा एकत्र लढणार होते, मात्र त्यापूर्वीच नियतीने हा घात केला, अशी हळहळ सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.
राज्याचे राजकारण बेचव आणि दिशाहीन झाले
अजित पवारांचे राजकारण हे नेहमीच धाडसी निर्णयांनी भरलेले राहिले. ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप खुद्द पंतप्रधानांनी लावूनही, महिनाभरात त्याच भाजपसोबत सत्तेत सामील होऊन उपमुख्यमंत्री होणे, हे त्यांच्या राजकीय चातुर्याचेच लक्षण होते. पहाटेचा शपथविधी असो वा सत्तेत राहून प्रशासनावर पकड ठेवण्याचे कसब, अजितदादा नेहमीच केंद्रस्थानी राहिले. अनेकदा भाषणातून वाहवत गेल्याने त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागले, मात्र गेल्या काही वर्षांत त्यांच्यात प्रचंड संयम दिसून येत होता. महाराष्ट्राच्या राजकारणाची मोठी हानी आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख आणि आर. आर. पाटील यांच्यानंतर अजित पवारांच्या रूपाने महाराष्ट्राने पुन्हा एकदा एक उमदं आणि खंबीर नेतृत्व गमावले आहे. जणू महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणाची तरी दृष्ट लागली आहे. त्यांच्या जाण्याने आज लाखोंचा कार्यकर्ता वर्ग पोरका झाला असून, राज्याचे राजकारण बेचव आणि दिशाहीन झाले आहे, अशी शोकसंवेदना सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.
