लैच चुरू चुरू बोलायला लागला… भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झाला; अजितदादांनी स्टेजवरच कुणाला सुनावलं?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांना , 'लैच चुरू चुरू बोलायला लागला... भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झाला' असा टोला लगावला.

सांगलीतील इस्लामपूरमध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील (माई) मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार रोहित पवार, जयंत पाटील, चंद्रकांत पाटील हे नेते उपस्थित होते. यावेळी भाषण करताना अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांना , ‘लैच चुरू चुरू बोलायला लागला… भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झाला’ असा टोला लगावला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अजित दादांचे माझ्याकडे लक्ष नाही – रोहित पवार
यावेळी भाषण करताना आमदार रोहित पवार यांनी 40 ला रुपयांच्या निधीची घोषणा केली. ते म्हणाले की, ‘पूर्वी अजित पवार माझ्याकडे लक्ष देत होते. मी अधिवेशनात पहिल्यांदा भाषण केलं होतं तेव्हा मला अजित पवारांचा फोन आला होता. भाषण चांगलं झालं पण तुझ्यावर सगळीकडून कॅमेरे असतात. जरा शर्टचे बटन लावत जा. तेव्हा त्यांचं माझ्यावर बारीक लक्ष होतं. पण आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला विसरले आहेत असं विधान केलं होतं. याला आता अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
लैच चुरू चुरू बोलायला लागला…
अजित पवार म्हणाले की,’रोहितने बरंच काही सांगितलं. मी 40 लाख देतो. चंद्रकांत दादांनी एक पूज्य वाढवावं. मी एक पूज्य वाढवावं. बरं झालं सांगितलं नाही दादा एक पूज्य वाढवतील. आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि अजितदादा अजून एक पूज्य वाढवतील. तेवढंच बाकी राहिलं होतं. फार चुरू चुरू चुरू बोलत होता. म्हटलं गाडी फार फास्ट चालली आहे.’
भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास…
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘काहींनी बोलताना सांगितलं. दादांचं गावकीकडे लक्ष आहे. भावकीकडेही लक्ष द्या. अरे भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा. किती मते पडली. पोस्टल बॅलेटमध्ये आला आपण. त्यामुळे माझ्या नादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा. मी एक अक्षर बोलणार नाही. मी महायुतीत आहे. मी कधी तुमच्यावर टीका केली. नाही. तुम्ही तुमच्या विचाराने चालला. मी माझ्या विचाराने चाललो. शेवटी आपल्याला काय करायचं. महाराष्ट्राचा विकास.’
