Sanjay Raut : अजित पवारांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष भविष्यात राहणार नाही – संजय राऊतांचा मोठा दावा
अजित पवार यांनी स्थापन केलेला पक्ष भविष्यात राहणार नाही. पटेल , तटकरे, भुजबळ, मुंडे हे पक्ष फोडल्याबद्दल पश्चाताप करत असतील, अशा शब्दांत संजय राऊत यांनी राष्ट्रवादीतील घडामोडी, अंतर्गत कलहांवर भाष्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेल्या काही काळापासून तणावाचं वातावरण असून पक्षांतर्गत कुरबुरू वाढलेल्या दिसत आहेत. आधी फक्त प्रफुल पटेल, तटकरे यांच्यापर्यंतच वाद पोहोचला होता. पक्षातील वागणुकीमुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. त्याच चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मध्यंतरी शरद पवार यांचीदेखील भेट घेतली होती. मात्र आता राष्ट्रवादीमधील कुरबुरी आणखीनच वाढल्याचे दिसत आहेत. तटकरे, पटेल यांच्यापर्यंतच असलेला वाद आता भुजबळांपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले.
एका विशिष्ट ठेकेदाराल काम द्या अशा सूचना पार्थ पवार यांनी भुजबळांना दिल्या, मात्र त्या मानल्या गेल्या नाहीत. त्यावरून भुजबळांशी वाद झाला.तेव्हा ते असं म्हणाले की जेव्हा शरद पवार , अजित पवार होते तेव्हा कधी अशा गोष्टी घडत नव्हत्या, ज्या आत्या घडत आहे,असं म्हणत भुजबळांनी नाराजी नोंदवली. या सर्व प्रकरणावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
झक मारली आणि अजित पवारांना शरद पवारांपासून तोडलं…
मी काल काय सांगितलं होतं, हा (राष्ट्रवादी) पक्ष राहणार नाहीये. अजित पवार यांनी स्थापन केलेला हा पक्ष भविष्यात राहणार नाही. आता भुजबळ, प्रफुल पटेल,तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे ही चौकडी आता पश्चातापदग्ध असतील. झक मारली आणि अजित पवारांना, शरद पवारांपासून तोडून, त्यांचं डोकं फिरवून आम्ही भाजपच्या वळचणीला बांधलं, असं त्यांना आता वाटत असेल, त्यांना पश्चाताप नक्की होत असेल, असं राऊत म्हणाले. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहांवर त्यांनी हे भाष्य केलं.
आता आमचं काय काम आहे, जे घडतंय ते पहात रहावं आणि जे जे घडतंय ते घडू द्यावं, हे आमचं राजकीय काम आहे, असंही राऊत म्हणाले.