
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमानाचा २८ जानेवारी २०२६ रोजी अपघात झाला. या विमान अपघाताला एक महिना उलटला आहे. या भीषण अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या निधनानतंर सातत्याने त्यांच्या विमान अपघाताबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. अजित पवारांच्या कुटुंबियांकडून सातत्याने या विमान अपघाताची चौकशी करा अशी मागणी केली जात आहे. मात्र दिवसेंदिवस त्यांच्या विमान अपघाताचे गूढ अधिकच गडद होताना दिसत आहेत. त्यातच आता शरद पवार गटाच्या एका नेत्याने याप्रकरणी धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टने सध्या महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता आणि संघटक सचिव विकास लवांडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अजित दादांचा मर्डर झालाय, यावर माझं ठाम मत बनलंय. सदर प्रकरण दडपण्याचा उच्च पातळीवरुन प्रयत्न सुरु आहे, असा दावा विकास लवांडे यांनी केला आहे.
शासनाची व चौकशी करणाऱ्या यंत्रणांची भूमिका पाहता आदरणीय अजितदादांचा सुनियोजित मर्डर झालेला आहे यावर माझे ठाम मत बनलेले आहे. सदर प्रकरण दडपण्याचा उच्च पातळीवरून प्रयत्न सुरू आहे. कारण अजितदादा हे कुणाचा तरी मोठा राजकीय अडथळा बनलेले असावेत. इतिहास तपासला तर अनेक प्रकरणे दडपली आहेत हे लक्षात येईल, असे विकास लवांडे यांनी म्हटले.
शासनाची व चौकशी करणाऱ्या यंत्रणांची भूमिका पाहता आदरणीय अजितदादांचा सुनियोजित मर्डर झालेला आहे यावर माझे ठाम मत बनलेले आहे. सदर प्रकरण दडपण्याचा उच्च पातळीवरून प्रयत्न सुरू आहे.
कारण अजितदादा हे कुणाचा तरी मोठा राजकीय अडथळा बनलेले असावेत.
इतिहास तपासला तर अनेक प्रकरणे दडपली आहेत…— Vikas Lawande (@VikasLawande1) March 4, 2026
विकास लवांडे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता वाद रंगण्याची शक्यता आहे. यापूर्वीच अजित पवार यांच्या कुटुंबियांनी अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी लावून धरली होती. तसेच या प्रकरणाची सीबीआय (CBI) किंवा उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र लवांडे यांनी थेट राजकीय अडथळा दूर करण्यासाठी हा घातपात घडवून आणल्याचा आरोप केल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. आता यावर काय स्पष्टीकरण येते, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.