ना फडणवीस, ना मोदी, अकोल्यातील पठ्ठ्याचे थेट अमेरिकेतील ट्रम्प सरकारला साकडं, कारण काय?
अकोल्यातील दामोदर गावंडे यांनी सरकारी जमिनीवर बांधलेल्या घराबाबतचा वाद सोडवण्यासाठी अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली आहे. गावंडे यांना स्थानिक प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही, म्हणून त्यांनी हे अद्वितीय पाऊल उचलले आहे.

हल्ली कोण कशासाठी उपोषण करेल काहीही सांगता येत नाही. कोणी मुलभूत हक्कांसाठी तर कोणी पाण्यासाठी कायमच उपोषण करत असतात. मात्र नुकतंच अकोल्यातील एका पठ्ठ्याने केलेल्या उपोषणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. कारण या उपोषणकर्त्याने आपले प्रश्न सोडवण्यासाठी थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारला साकडे घातले आहे. आता ट्रम्प सरकारने माझ्या प्रश्नावर थेट मोदी सरकारशी चर्चा करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या आंदोलकाने केली आहे.
अकोल्यात सध्या एक विचित्र उपोषणाची चर्चा सुरू आहे. यात एका व्यक्तीने आपला प्रश्न सोडवण्यासाठी थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारला साकडे घातले आहे. दामोदर वासुदेव गावंडे असे या उपोषणकर्त्याचे नाव आहे. ते अकोला जिल्ह्यातील गोरेगाव बुद्रुक येथील रहिवासी आहेत. त्यांच्या या मागणीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नेमकं प्रकरण काय?
दामोदर गावंडे यांनी गेल्या २५ वर्षांपासून गावातील गट क्रमांक ११२ मधील सरकारी ‘ई क्लास’ जमिनीवर घर बांधले होते. त्यांचे म्हणणे आहे की, गावातील इतर अनेक अतिक्रमणधारकांना ग्रामपंचायत आणि तहसील प्रशासनाने हक्क प्रमाणपत्र दिले आहे. मात्र, त्यांच्या बाबतीत मात्र ग्रामपंचायत, तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने जागा खाली करण्याची नोटीस बजावून त्यांच्यावर अन्याय केला आहे. या अन्यायाविरुद्ध त्यांनी अनेकदा सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवले. पण त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला आहे.
ट्रम्प सरकारकडे का केली मागणी?
दामोदर गावंडे यांनी मागणी करुन अमेरिकेच्या ट्रम्प सरकारला साकडे घातले आहे. जर अमेरिका सरकारच्या सल्ल्याने भारत-पाकिस्तानमधील युद्ध थांबवता येऊ शकते, तर अमेरिकेने त्यांच्या प्रश्नातही हस्तक्षेप करावा आणि मोदी सरकारला त्यांना न्याय देण्यास सांगावे, अशी भूमिका दामोदर गावंडे यांनी घेतली आहे. या अफलातून मागणीमुळे अकोल्यातील या उपोषणाची चर्चा राज्यभर पसरली आहे.
