मोठी बातमी ! अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात नवे वळण; पालक दीड महिन्यापासून बेपत्ता
अक्षयचे पालक अचानक संपर्काबाहेर गेले असून, त्यांचे घर कुलूपबंद आढळल्याची माहिती समोर आली आहे. अंबरनाथमध्ये मावशीकडे वास्तव्यास असलेले अक्षय शिंदे याचे पालक तेथूनही निघून गेले आहेत. त्यांचा कुठेच पत्ता नाहीये.

बदलापूरमधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे कथित एन्काऊंटर झाले. आता अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात नवे वळण आले आहे. अक्षय शिंदे याचे पालक गेल्या दीड महिन्यापासून बेपत्ता असून ते वकिलांच्याही संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खळबळ माजली ाहे.
बदलापूर अल्पवयीन विद्यार्थिनींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची एसआयटी चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र या आदेशानंतर अक्षयचे पालक अचानक संपर्काबाहेर गेले असून, त्यांचे घर कुलूपबंद आढळल्याची माहिती समोर आली आहे. अंबरनाथमध्ये मावशीकडे वास्तव्यास असलेले अक्षय शिंदे याचे पालक तेथूनही निघून गेले आहेत, असेही उघड झाले आहे.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात न्यायालयात दाद मागण्यासाठी शिंदे यांच्या पालकांनी वकील अमित कटरनवरे यांची नेमणूक केली होती. मात्र, केस लढण्याची इच्छा नसल्याचे कोर्टात सांगितल्यानंतर आता पालक त्या वकिलांच्याही संपर्कात नाहीयेत. गेल्या तब्बल दीड महिन्यांपासून शिंदे याचे पालक कुठे आहेत याची कोणालाही माहिती नाही, ते नेमके कुठे गेले, कसे आहेत, याची कोणालाच काहीही कल्पना नाही. त्यामुळे आता हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे.
हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका
दरम्यान अक्षय शिंदे प्रकरणात आणखी एक मोठी घडामोडी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला असून राज्य सरकारला चांगलाच दणका दिला आहे. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी आरोप करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.
न्यायालयाचा नेमका निर्णय काय ?
अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर झाल्यानंतर त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी पोलिसांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. माझ्या मुलाचे एन्काऊंटर नसून तो नियोजनबद्ध कट आहे, असा दावा करत त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच प्रकरणी न्यायालयाने अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरमध्ये ज्या पोलिसांचा समावेश होता, त्या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा असंही उच्च न्यायलयाच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
