मोठी बातमी! जमीन घोटाळ्याचा आरोप, पार्थ पवार यांना सर्वात मोठा दणका, थेट आदेश निघाला
पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे, यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे, आता या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

मोठी बातमी समोर आली आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील मोक्याच्या 40 एकर जागेचा बेकायदेशीर व्यवहार करण्यात आला, या व्यवहारातून मूळ मालक आणि सरकारची फसवणूक झाली, ही जमीन पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीने खरेदी केली अशी माहिती मुद्रांक शुल्क विभागाच्या प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे. दरम्यान या प्रकरणात आता पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
1800 कोटी रुपयांची जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप होत आहे, तसेच 300 कोटी रुपयांच्या जमीन व्यवहारावर अवघे 500 रुपयांचं मुद्रांक शुल्क भरल्याचा आरोप देखील होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून अमेडीया कंपनीला नोटीस पाठवण्यात आली आहे. पार्थ पवार यांच्या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
पार्थ पवार यांची कंपनी असलेल्या अमेडीया कंपनीला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागानं नोटीस पाठवली आहे. हा जमीन व्यवहार होत असताना फक्त 500 रुपयांचा मुद्रांक शुल्क भरण्यात आलं होतं. झालेल्या व्यवहाराच्या दोन टक्के म्हणजे जवळपास सहा कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित असताना देखील फक्त 500 रुपयेच मुद्रांक शुल्क भरण्यात आलं. त्यामुळे आता मुद्रांक शुल्क विभागाकडून या कंपनीला ही नोटीस बजावण्यात आली आहे, सहा कोटी रुपये भरण्याचे आदेश या नोटीसच्या माध्यमातून मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता या नोटीशीनंतर कारवाई होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
ज्या जमिनीसंदर्भात हे आरोप होत आहे ती जमीन पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही जमीन तब्बल 40 एकर इतकी आहे. या जमिनीची किंमत 1800 कोटी रुपये असताना ती केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप होत आहे. तसेच या व्यवाहारावर मुद्रांक शुल्क म्हणून केवळ 500 रुपये भरल्याचीही माहिती समोर येत आहे.
