आता हापूस जीआय मानांकनाशिवाय विकता येणार नाही

रत्नागिरी : कोकणातल्या हापूस आंब्याच्या नावाखाली जर दुसऱ्या राज्यातील आंबा हापूस म्हणून विकला जात असेल तर, विक्रेत्याला अटक होऊ शकते. कारण आता कोकणचा आणि फळांचा राजा हापूस आंबा जीआय मानांकनाशिवाय विकता येणार नाही. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या कोकणातील पाच जिल्ह्यात उत्पादन होणाऱ्या आंब्याला जीआय मानांकन मिळालं आहे. कोकणचा मान म्हणून हापूस आंब्याची …

आता हापूस जीआय मानांकनाशिवाय विकता येणार नाही

रत्नागिरी : कोकणातल्या हापूस आंब्याच्या नावाखाली जर दुसऱ्या राज्यातील आंबा हापूस म्हणून विकला जात असेल तर, विक्रेत्याला अटक होऊ शकते. कारण आता कोकणचा आणि फळांचा राजा हापूस आंबा जीआय मानांकनाशिवाय विकता येणार नाही. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या कोकणातील पाच जिल्ह्यात उत्पादन होणाऱ्या आंब्याला जीआय मानांकन मिळालं आहे.

कोकणचा मान म्हणून हापूस आंब्याची ओळख आहे. पण आता कोकणचा हा हापूस जीआय मानांकनाच्या प्रमाणापत्राशिवाय विकता येणार नाही. विशिष्ठ चव, गोडवा आणि रंगामुळे हापूस प्रसिद्ध आहे. त्यामुळेच कोकणच्या हापूस आंब्याला हे जीआय मानांकन मिळालं आहे. हे जीआय मानांकन मिळालेल्या चार संस्था आहेत. त्यामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकार संस्था रत्नागिरी, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित जामसंडे आणि केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संस्था केळशी दापोली या संस्थांचा समावेश आहे. त्यामुळे यापुढे सर्वच आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अधिकृतरित्या हापूसची विक्री करण्यासाठी या चार संस्थांपैकी एका संस्थेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

या चार संस्थांकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच आंबा उत्पादक शेतकऱ्याला आणि विक्रेत्याला हापूस हा टॅग वापरून आंबा विकता येणार आहे. मात्र, हापूसच्या नावाखाली इतर राज्यातील आंब्याची हापूस म्हणून विक्री केली गेली, तर अशा शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तर ग्राहकही अशा फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याला थेट ग्राहक न्यायालयात खेचू शकतो.

प्रमाणपत्र घेतलेल्या कोकणातल्या आंबा बागायतदारांना त्या-त्या विभागातील नावांचा वापर करता येणार आहे. म्हणजे देवगडमधील आंबा उत्पादक शेतकऱ्याला ‘देवगड हापूस’ किंवा रत्नागिरीतल्या आंबा उत्पादक शेतकऱ्याला ‘रत्नागिरी हापूस’ असं नाव वापरता येईल.

कोकणातल्या हापूसच्या नावावर परराज्यातून आलेल्या आंब्याची सर्रास विक्री होते. त्यामुळे कोकणच्या हापूसचं नाव बदनाम होत आहे. पण आता जीआय मानांकनाच्या प्रमाणपत्रामुळे हापूसच्या नावे होणारी फसवणूक टाळली जाणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *