“मला शोधणाऱ्याला 1 लाखाचे बक्षीस…” अंबरनाथमध्ये बिझनेसमॅनच्या घरावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराची पोस्ट
अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर आरोपी जितेंद्र पवार फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असताना, पवारने सोशल मीडियावर पोलिसांना एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे आव्हान दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे. काही ठिकाणी दिवसाढवळ्या खून, बलात्कार, गोळीबार अशा हादरवणाऱ्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता अंबरनाथमधील उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार करणारा हल्लेखोर जितेंद्र पवार याने पोलिसांना थेट चॅलेंज दिले आहे. मला शोधणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस असे जाहीर आव्हान जितेंद्र पवार यांनी दिले आहे. या घटनेमुळे अंबरनाथ परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सोमवारी (२१ एप्रिल) जितेंद्र पवारने उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर दोन गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर तो फरार झाला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन त्याने गोळीबारादरम्यान वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. तसेच जितेंद्र पवार याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चार विशेष पथके तयार केली आहेत. सध्या त्याचा कसून शोध सुरु आहे.

एकीकडे पोलिसांचा शोध सुरु असतानाच दुसरीकडे जितेंद्र पवारने सोशल मीडियाचा वापर करत खळबळजनक पोस्ट केल्या आहेत. पोलिसांचा शोध सुरू असतानाच जितेंद्र पवारने फेसबुकवर स्टोरी पोस्ट करत खळबळ उडवली आहे. “मला शोधणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस..” अशी पोस्ट जितेंद्र पवारने टाकली आहे. त्यानंतर त्याने अंबरनाथ शहराला एकच भीती टायगर भाईचे नंबर किती” असेही एका पोस्टद्वारे म्हटले आहे. या पोस्टमुळे त्याने पोलिसांना उघडपणे आव्हान दिल्याचे बोललं जात आहे. या घटनेमुळे अंबरनाथ शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस जितेंद्र पवारला कधी अटक करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

jitendra pawar (1)
आता पोलीस या आव्हानाला कसे प्रत्युत्तर देतात आणि जितेंद्र पवारला कधी बेड्या ठोकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या घटनेमुळे अंबरनाथमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आरोपीला लवकरात लवकर पकडतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
