
BJP-AIMIM in Amravati Mayor: अमरावतीत भारतीय जनता पार्टीने मित्र पक्ष आणि विरोधकांचे हिशोब एकदाच चुकते केल्याचं मानलं जात आहे. भाजप इथं धुरंधर ठरली आहे. भाजपने कट्टर विरोधक एमआयएमच्या पाठिंब्याने महापौर पद खिशात घातलं. एआयएमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांनी भाजपचे उमेदवार श्रीचंद तेजवानी यांना मतदान केले. या एका मताने भाजपचं पारड जड भरलं. श्रीचंद तेजवानी अमरावतीचे महापौर झाले. या खेळीने अनेकांचे भाजपचं गणित बिघडवण्याचं स्वप्न भंग पावलं. अमरावतीच्या महापालिकेतील राजकीय घडामोड काय?
महापौर पदाचा काय फॉर्म्युला?
अमरावतीमधील महायुतीत भाजप, शिंदे सेना, अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा समावेश आहे. भाजपच्या महापौरपदासाठी राजकीय तडजोडी आणि समीकरणं जुळवण्यात आली. श्रीचंद तेजवानी यांना 1.5 वर्षासाठी तर भाजपचे आशिष अतकरे यांना 1.5 वर्षासाठी महापौर पद मिळणार आहे. तर युवा स्वाभिमानी पक्षाचे सचिन भेंडे हे उपमहापौर झाले आहेत.
या निवडणुकीत भाजपतंर्गत आणि भाजप विरुद्ध इतर पक्ष असा कलह अनेकदा समोर आला. तरीही भाजपने महापौर पद हातचं जाऊ दिलं नाही. 22 भाजप उमेदवारांनी, ज्यातील 20 जण या निवडणुकीत पराभूत झाले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नवनीत राणा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी पत्र लिहिले होते. तर युवा स्वाभिमानी पक्षाने काही जागांवर भाजप उमेदवारांना पराभूत केले. त्यामुळे वाद वाढला होता.
एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांची हकालपट्टी
अमरावतीत महापौर पदासाठी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षाविरोधात जाऊन भाजपला समर्थन देणे एमआयएमच्या नगरसेविलेला भोवले. मीरा कांबळे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भात एमआयएमच्या वतीने अमरावती महानगरपालिका आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे.
एमआयएमच्या नगरसेविका मिरा कांबळे यांनी भाजपच्या महापौर उमेदवाराला मतदान केले. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत त्यांनी पक्षादेशाचे उल्लंघन केले. मीरा कांबळे यांची तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. एमआयएमकडून सर्व 12 नगरसेवकांसाठी अधिकृत व्हीप जारी करण्यात आला होता. तरीही कांबळे यांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन मतदान केल्याचा आरोप आहे. पक्षादेश मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा गटनेत्यांनी दिला आहे. या सर्व घडामोडीत कांबळे यांचे नगरसेवक पद रद्द होऊ शकतं का, त्यांचा राजकीय बळी जाणार का? असा सवाल विचारल्या जात आहे.