
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाने राज्याचे लक्ष वेधले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसाठी बच्चू कडू यांनी 8 जूनपासून आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. मोझरी येथील गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीसमोर त्यांचे हे उग्र उपोषण सुरू आहे. काल सरकारच्या वतीने महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली. मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर कार्यकर्त्यांची बाजू ऐकून उपोषण सोडण्याविषयी निर्णय घेणार असल्याचे सांगितले. आता थोड्याचवेळात ते निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलन स्थळी 200 पेक्षा अधिक पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.अन्नत्याग आंदोलन स्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. त्यांचे कार्यकर्ते पण अनेक ठिकाणी आंदोलन करत आहेत. काल एका कार्यकर्त्याने विषारी औषध प्राशन केले होते. तर काहींनी कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना कोंडण्याचा प्रयत्न केला होता. कोणताही अनुचित प्रकार आंदोलन स्थळी होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. बच्चू कडू आज काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
उदय सामंत भेटीला
मंत्री उदय सामंत बच्चू कडू यांची आज भेट घेणार आहेत. यापूर्वी मंत्री संजय राठोड आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास मंगेश चिवटे यांनी सुद्धा बच्चू कडू यांची भेट घेतली होती. दरम्यान शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर अनेक संघटनांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनाला राज्यात व्यापक पाठिंबा मिळत आहे. सरकार बच्चू कडू यांच्या मागण्यांविषयी आता ठोस आश्वासन देते की समित्यांचे पालुपद पुढे करत हा मुद्दा काही काळ पुढे ढकलते हे आज समोर येईल. मंत्री उदय सामंत हे कोणता प्रस्ताव घेऊन येतात, ते तोडगा काढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता बच्चू कडू आंदोलनाची दिशा जाहीर करण्याची शक्यता आहे.