संतोष देशमुख प्रकरणात उज्वल निकम यांची नियुक्ती; मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले…

सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, यावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील यांनी मोठी मागणी केली आहे.

संतोष देशमुख प्रकरणात उज्वल निकम यांची नियुक्ती; मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले...
| Updated on: Feb 26, 2025 | 7:37 PM

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी संतोष देशमुख यांचं कुटुंब आणि ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. अखेर या प्रकरणात आता ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?  

उज्वल निकम साहेबांची जी नियुक्ती झाली ती चांगली गोष्ट आहे. परंतु यामध्ये विशेष जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे जे सहआरोपी आहेत ते कधी होणार आहेत?  हा मोठा कळीचा मुद्दा आहे. नुसतं भावनिक होऊन चालणार नाही, सरकार जर मस्साजोग प्रकरणात छुपा अजेंडा राबवत असेल तर ते जमणार नाही. मागच्या तीन महिन्यात कोणी सहआरोपी झाले का? मागच्या दोन महिन्यांपासून निकम साहेबांच्या नियुक्तीची मागणी सुरू आहे. तिला 2 महिने लागले, शेवटी त्यासाठी आंदोलनच करावं लागलं, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गोर गरीबांना या राज्यात न्याय नाही. फक्त कागद दाखवून लोकांना भावनिक करायचं. ते सहआरोपी झाले का? दोषी पोलिसांना सहआरोपी केलं का?  खंडणी आणि खून करणाऱ्याला ज्यांनी साथ दिली त्यांना सहआरोपी केलं का? तर नाही. गाड्या पुरवणारे, पैसा पुरवणारे कोणालाच सहआरोपी करण्यात आलं नाही, आळंदीला कोण गेले होतं? ते सहआरोपी झाले का तर नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

धनंजय देशमुख यांना धमकी देणारे सहआरोपी झाले का? अजिबात नाही, तर मला एक म्हणायचं आहे, या प्रकरणांमध्ये प्रगती काय झाली. फक्त कागद दाखवून भावनिक करणे हे दिशाभूल करण्याचे काम सातत्यानं मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचं हे साधं काम आहे, परंतु मुख्य काम आहे ते म्हणजे त्यांना ज्यांनी -ज्यांनी मदत केली त्यांना सहआरोपी करावं, अशी मागणी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.