
बारामती विमानतळाजवळ 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेनंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. अजित पवारांसह एकूण 5 जणांचा या अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यातील अनेक नेत्यांनी या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. राष्ट्र्वादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी विमान कंपनीवर गंभीर आरोपही केले आहेत. अशातच आता मनोज जरांगे पाटलांनीही या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. अजित दादांच्या विमान अपघातावर बोलताना जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठं विधान केलं आहे. जरांगे पाटील म्हणाले की, दादांच्या जाण्याने सगळ्यांचे खूप मोठे वाटोळे झाले आहे. कुटुंबाला संशय असेल तर चौकशी झाली पाहिजे. चौकशी केली काय? नाही केली काय? दादा परत येणार नाहीत. दादांनी जातीवाद केला नाही, ते सगळ्या जातीचे होते. आधी काही वाटत नव्हतं. मात्र जसा वेळ लागायला लागला तसे प्रश्न उपस्थित होत आहेत. महाराष्ट्राचे नुकसान कोणी भरून काढू शकत नाही.
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अहवाल ब्लॅक बॉक्सच्या तपासणीनंतर समोर येणार आहे. मात्र हा बॉक्स जळालेल्या अवस्थेत होता अशी माहिती समोर आली आहे. यावर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, ‘ब्लॅक बॉक्सचा फोटो आमच्याकडे आलेला आहे. तो कसा आहे? किती जळालेला आहे याचीही माहिती आमच्याकडे आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय याची कसा तपास करते याची आम्ही वाट पाहत आहोत. अधिवेशनाच्या निमित्ताने मी सरकारमधील लोकांना सांगू इच्छितो की, आम्ही आतापर्यंत फक्त 20 ते 30 टक्के माहिती दिली आहे. आमच्याकडे आणखी 70 टक्के माहिती आहे. त्यामुळे तपास योग्य पद्धतीने होत नसेल आणि जर त्यात काही काळंबेरं झालं तर सरकारला महागात पडेल.’
अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अहवाल 28 फेब्रुवारी येणार असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले की, ‘अजित पवार पवार यांच्या विमान अपघाताचा 28 फेब्रुवारी आधीच प्राथमिक अहवाल येणार आहे.’ आता या अहवालातून नेमकी काय माहिती समोर येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.