मनोज जरांगे अराजकता निर्माण करताय, त्यांच्यामागे कोण? राज्यमंत्र्याने सगळंच सांगून टाकलं
मनोज जरांगे अराजकता निर्माण करत असल्याचा आरोप मंत्री आशिष जयस्वाल यांनी केला. त्यांच्यामागे कोण आहे, असा सवाल जयस्वाल यांनी उपस्थित केला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर येऊन आंदोलन करण्यावर ठाम आहेत. मनोज जरांगे यांच्या सहकराऱ्यांकडून सातत्याने आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी मागत आहेत. त्यांचे सलग 2 अर्ज मुंबई पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. त्यानंतर जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी तिसरा अर्ज पोलिसांना केला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मुंबईकडे निघण्याची तयारी केली आहे. आज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्याआधीच त्यांच्यावर राज्यमंत्र्याने गंभीर आरोप केला आहे. काही जण त्यांच्या आडून अराजकता निर्माण करत आहे, अशा शब्दात राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आरोप केला आहे.
मनोज जरांगे पाटील आज एकटेच मुंबईला रवाना होणार आहेत. ते साधारणत अकरा वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या सोबत शेकडोंच्या संख्येने पोलीस बंदोबस्त असणार आहे. त्यात तिससऱ्या अर्जानंतर पोलीस परवानगी देतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी या सरकारने मराठा समाजाच्या हिताचे सर्वाधिक निर्णय घेतल्याचे सांगितले.
मंत्री आशिष जयस्वाल पुढे म्हणाले, ‘ज्यांनी मराठा समाजासाठी काहीही केलं नाही, त्यांच्या इशाऱ्यावरुन जरांगे पाटील समाजात अराजकता निर्माण करणं, खालच्या स्तरावर टीका करणे. योग्य नाही. मनोज जरांगे पाटील कुणाच्या इशाऱ्यावरुन हे करत आहेत. जरांगे पाटील यांना इतर लोकांनी उघडं करायला पाहिजे. समाजात अराजकता निर्माण करण्याची जरांगे पाटील यांची कृती योग्य नाही’. जरांगे यांच्यामागे विरोधी पक्ष आहे का, असा प्रश्न विचारल्यावर जयस्वाल म्हणाले, ही शोध घेण्याची बाब आहे. पण समजने वाले को इशारा काफी है’. जयस्वाल पुढे म्हणाले, ‘आपलं राज्य कायद्याचं राज्य आहे. नियमानुसार जात पडताळणी समिती काम करत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मनात काय आकस आहे, द्वेष आहे माहित आहे’. दिशा सालियन प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं. आता या प्रकरणात कोणीही असो, चौकशीला सामोरे जाणं गरजेचं आहे’ .