आम्हीच नाही तर भाजपनेही शिंदे गटाला डिवचले, अजित पवार यांनी त्या बॅनरवरुन केला निशाणा
राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी औरंगाबादमध्ये सत्ताधारी पक्षावर चांगलाच घणाघात केला. यावेळी सरकार अन् युती यावरही त्यांनी भाष्य केले. तसेच नांदेडमध्ये भाजपकडून लागलेल्या बॅनरवरही मत मांडले.
दत्ता कानवटे, औरंगाबाद : राष्ट्रवादीचे नेते अन् राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार शनिवारी औरंगाबादमध्ये आले. सामाजिक न्याय विभागाच्या कार्यक्रमासाठी ते आले असताना सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली. तसेच शिवसेना अन् भाजपवर घणाघात केला. आपल्या खास शैलीत त्यांनी सत्ताधारी पक्षाला चिमटे धरले. महाराष्ट्रात जे घडतंय त्याचे महाराष्ट्रातील जनतेला काहीही देणं घेणं नाही. जनतेला महागाई कमी व्हावे असे वाटते, कांद्याला अनुदान मिळावे असे वाटते, असे अजित पवार यांनी सांगितले.
नांदेडवरील बॅनरवरुन निशाणा
नांदेडच्या मध्यवर्ती भागातच बॅनर्स लागले होते. या बॅनर्सवरील मजकूर शिंदे गटाला डिवचणारा होता. त्यातून भाजपलाही चिमटे काढण्यात आले होते. 50 खोके, 105 डोके… देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्रच… माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस समर्थक, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं होतं. या बॅनरवर चाणक्याचा फोटो होता. तसेच असंख्य खोक्यांचाही फोटो होता. त्यामुळे या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली होती. यावरुन अजित पवार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले, नांदेडमध्ये एक बॅनर लावले. 50 खोके 105 डोके, असे लिहिले होते. यातून भाजपने शिंदे गटाला डिवचले आहे. भाजपवाले शिंदे गटाला 50 खोके म्हणत असतील तर अवघड आहे. 50 खोके एकदम ओके, आशा आम्ही घोषणा दिल्या, त्यावेळी अनेकांना वाईट वाटलं आहे. पण ही घोषणा आता तळागाळापर्यंत पोचली आहे.
जय-वीरुवरुन डिवचले
पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी अन् देवेंद्र फडणवीस यांची जोडी जय-वीरुची जोडी असल्याचे म्हटले होते. त्यावर अजित पवार यांनी निशाणा साधला. जय वीरु ही तुमची कशाची जोडी आहे, आम्हाला काय माहीत नाही. आमच्याकडे शेतात बैलांच्या जोड्या असायच्या, पण आम्हाला त्यांच्याशी तुलना करायची नाही.
जाहिरातीवरुन केले लक्ष्य
शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीवरुनही अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले. अजित पवार म्हणाले की, करोडो रुपयांची जाहिरात देता पण त्यात ज्याचं नाव घेऊन सत्तेत आलात त्यांचा फोटो टाकत नाही. दुसऱ्या दिवशी फोटो टाकता. ते हृदयात आहे म्हणता, मग दुसऱ्या दिवशी पेपरात फोटो कसे टाकता? पहिल्याच दिवशी का टाकला नाही?
सत्तारच नाही तर अनेक प्रकरणे येतील
राज्यात फक्त अब्दुल सत्तार यांचीच नाही तर अनेकांची प्रकरणे बाहेर पडत आहेत. काही ठिकाणी धाडी टाकल्या जातात. पण या धाडी कायदेशीर की बेकायदेशीर हे पाहिले पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच पुण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असे बॅनर लागले आहे, त्याला माझा पाठिंबा आहे, असे त्यांनी म्हटलंय.