Nature | माणसांनी घरट्यांसहित झुडुपं हटवली, पक्ष्यांनी मग उंचच निवारा शोधला, निलगिरीच्या झाडावर राखी सारंग पक्ष्यांची नवी वसाहत काय सांगतेय?

मंजिरी धर्माधिकारी, Tv9 मराठी

|

Updated on: Jul 14, 2022 | 4:10 PM

औरंगाबादमध्ये जायकवाडी (Aurangabad jayakwadi) बॅकवॉटर परिसरातील मावस गव्हाण शिवारात पक्षी निरीक्षकांना सारंगागार आढळले.

Nature | माणसांनी घरट्यांसहित झुडुपं हटवली, पक्ष्यांनी मग उंचच निवारा शोधला, निलगिरीच्या झाडावर राखी सारंग पक्ष्यांची नवी वसाहत काय सांगतेय?
Image Credit source: tv9 marathi

औरंगाबादः निसर्गातील प्राणी-पक्ष्यांच्या जागेवर मानवी आक्रमण वाढतंय. यामुळे हळू हळू प्राणीही आपला निवारा अन्यत्र शोधतायत. निसर्गातील हे बदल पक्षी (Birds)आणि वन्यजीव प्रेमींसाठी कधी क्लेशदायी तर कधी सुखद असे ठरतात. औरंगाबादमध्ये दुर्मिळ होत चाललेल्या एका पक्षाने आपलं घरटं बांधण्याची जागाच बदलली. पक्षीनिरीक्षकांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी जवळपास 15 दिवस या बदलाचं निरीक्षण केलं आणि त्यातून एक समाधानकारक निष्कर्ष काढला. औरंगाबादमध्ये जायकवाडी (Aurangabad jayakwadi) बॅकवॉटर परिसरातील मावस गव्हाण शिवारात पक्षी निरीक्षकांना सारंगागार आढळले. हे सारंगागार म्हणजे नेमकं काय आहे? निलगिरीच्या (Nilgiri tree) झाडावर राखी सारंग या पक्ष्यांनी बांधलेली घरटी हे कशाचे संकेत देतात, घरट्यांच्या बांधणीत काय आणि कसा बदल झालाय, याची माहिती मानद वन्य जीव रक्षक,पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी दिली.

nest

नाथसागर जलाशय परिसरात काय स्थिती?

डॉ. किशोर पाठक म्हणाले, ‘ नाथसागर जलाशायाजवळ झाडांची बेसुमार कत्तल झाल्याने या भागात एकटे दुकटे काटेरी झाड दिसते. आणि त्यावर एखाद दुसऱ्या पक्ष्यांचे घरटे दिसून येते. साधारणपणे दहा, बारा वर्षांपूर्वी परिसरात पाण्याच्या बाजूला बरीच उंच काटेरी झाडे असायची आणि त्यावर विविध प्रकारचे बगळे,सारंग, पान कावळे आपली घरटी बांधत असायचे परंतु अवैध गाळपेरे करण्यासाठी येथील झाडे मागील काही वर्षात तोडली गेली आणि जलाशय परिसर उजाड केला गेला. या भागात हिवाळा संपत आला की विविध पिके घेण्यासाठी शेतकरी या परिसरात जमीन नांगरतात,तिथली झाडे तोडतात जेणेकरून सगळीकडे पिके घेता येतील. नेमकी हीच गोष्ट या प्रजनन करणाऱ्या स्थानिक पक्ष्यांच्या मुळावर उठली.

Bird rakhi sarang

अनेक पक्षी दुर्मिळ झाले…

सगळीकडे सपाट नांगरलेली जमीन,जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेली मासेमारीची जाळे,थरमकॉल ची तुकडे,खराब कपडे, झाडांचा अभाव असे दृश्य दिसून येते ज्यामुळे पक्षी संख्या पूर्वीसारखी दिसत नाही.रोहित पक्ष्यापासून विविध बगळे,सारंग, बदके,करकोचे, सुरय व इतर पाणपक्षी संख्येने खूप कमी झाले आहेत. काही पक्षी यातून मार्ग काढतात..

निलगिरीच्या झाडावर राखी सारंगाची घरटी..

डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले, ‘ या परिसरात भटकंती करताना निलगिरी या विदेशी झाडावर राखी सारंग या स्थानिक पक्ष्यांची घरटी असलेले ठिकाण म्हणजेच सारंगागार आढळून आले. नाथसागर परिसरात झाडे न राहिल्याने या सारंग पक्ष्यांनी चक्क पाण्यापासून एक किमी दूर अंतरावर भर गावाजवळ 6 निलगिरीच्या झाडावर 26 घरटी बांधली. एकच झाडावर बरीच घरटी असणाऱ्या ठिकाणाला सारंगागार असे म्हणतात. संरक्षणाच्या दृष्टीने हे अनेक पक्षी एकच ठिकाणी घरटी बनवतात. पाण्याच्या जवळ असल्याने या पक्ष्यांना पिल्लांचे खाद्य जसे मासे,खेकडे,इतर जलचर, पान पक्ष्यांची पिल्ले आणणे सोपे होते.परंतु परिसरात उंच झाडी नसल्याने या पक्ष्यांनी जलशयापासून लांब असलेली निलगिरीची उंच झाडे निवडली आणि घरटी बांधली तसेच या ठिकाणी यशस्वी प्रजनन ही केले आहे.सारंग पक्षी जलाशयातील मासे ,इतर जलचर व पक्ष्यांची पिल्ले खावून अन्नसाखळी अबाधित ठेवतात तसेच आपल्या विष्ठेद्वारे नैसर्गिक खत झाड पिकांना देत असतात.म्हणून माणसाने सुध्दा यांना थोडी जागा देणे आवश्यक आहे.तसेच वन विभागाने पण सभोवताली असणाऱ्या झाडांचे रक्षण करणे ,तसेच पाण्याजवळ वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, असे मत डॉ. किशोर पाठक यांनी व्यक्त केले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI