औरंगाबादेत गारठ्याचा उच्चांक, पारा आणखी एका अंशाने घसरला, वाचा आजचे Weather Updates

औरंगाबादेत गारठ्याचा उच्चांक, पारा आणखी एका अंशाने घसरला, वाचा आजचे Weather Updates
प्रातिनिधिक छायाचित्र

उत्तरेकडील शीत वाऱ्यांची लाट महाराष्ट्रात दाखल झाल्याने दिवस आणि रात्रीचे तापमान निचांकी पातळीवर घसरले आहे. हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच औरंबादचे तापमान 7.3 अंशावर घसरले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 27, 2022 | 9:56 AM

औरंगाबादः उत्तरेकडील शीतवाऱ्यांच्या प्रभावामुळे औरंगाबाद शहर आणि परिसरात थंडीची लाट (Cold wave) पसरली आहे. त्यामुळे आज सकाळी शहराचे तापमान मोठ्या प्रमाणावर घसरले. औरंगाबाद शहरात आज सकाळी साडे सहा वाजता किमान तापमान 7.3 अंश सेल्सियसपर्यंत घसरले. मागील तीन दिवसांपासून शहराच्या तापमानात (Weather update) सातत्याने घट होत आहे. कालच्या पेक्षा आज तापमानाचा पारा आणखी एक अंश सेल्सियसने घसरला आहे. औरंगाबादसह मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांतील तापमानातही घट झालेली दिसून आली.

यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात निचांकी तापमान

उत्तरेकडील शीत वाऱ्यांची लाट महाराष्ट्रात दाखल झाल्याने दिवस आणि रात्रीचे तापमान निचांकी पातळीवर घसरले आहे. हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच औरंबादचे तापमान 7.3 अंशावर घसरले आहे. शहराच्या कमाल तापमानातही 6 अंशांनी घसरण झाल्याची नोंद झाली आहे. हे तापमान 23 अंश सेल्सियस पर्यंत घसरल्याचे दिसून आले

उत्तरेकडील थंडीची लाट

आठवड्याच्या सुरुवातीला भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर धुळीच्या वादळाने धडक दिली होती. त्यामुळे कोकण ते गुजरातपर्यंतचा पट्टा धुळीने झाकोळून गेला होता. तर दुसरीकडे उत्तर भारतात हिमवृष्टी सुरु आहे. तेथील अतिशीत वारे खेचून आणण्यासाठी आपल्याकडे पोषक वातावरण तयार झाल्याने आता ही थंडीची लाट पसरली आहे. मागील वर्षी 17 जानेवारी 2020 रोजी शहराचे तापमान 8.1 अंश सेल्सियसवर पोहोचल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली होती. यंदा 27 जानेवारील प्रथमच 7.3 अंशांची नोंद झाली आहे. मागील वर्षी औरंगाबाद शहराचा पारा दहा अंश सेल्सियसच्या खाली गेला नव्हता.

राज्यातील काही अनेक भागात आज सर्वाधिक गारठा

भारतीय हवामान खात्याचे तज्ज्ञ केएस होसळीकर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज 27 जानेवारी रोजी महाराष्ट्रात मोठी थंडीची लाट असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक निचांकी तापमानाची नोंद होऊ शकते. महाराष्ट्रातील औंरगाबाद, नाशिक, जळगाव, मालेगाव या भागात सर्वात कमी तापमान नोंदवण्यात येईल. तसेच पुढचे काही दिवस राज्यात थंडीची लाट कायम राहिल, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्या-

Damage Orchards : द्राक्ष मण्यांना तडे, अंतिम टप्प्यातील केळीबागाही उध्वस्त, आता संरक्षणाशिवाय पर्याय नाही

Nashik Crime | नाशिकमध्ये अवैध शस्त्रसाठा जप्त; पिस्तुल, काडतुसे, एअरगन, चॉपर, अग्निशस्त्रासह संशयितांना बेड्या


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें