Aurangabad कन्या, गूगल उद्योग प्रमुख मयुरी कांगो यांचं शहराला मदतीचं आश्वासन, हवामान योजनेविषयीची महत्त्वाची बैठक!
औरंगाबाद स्मार्ट सिटीची टीम आणि गूगल उद्योग प्रमुख मयुरी कांगो यांची नुकतीच एक ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत त्यांनी औरंगाबाद स्मार्ट सिटीला मदत करण्याचे आश्वासन दिले.

औरंगाबादः प्रसिद्ध अभिनेत्री, औरंगाबादची कन्या आणि आता गुगल उद्योग प्रमुख पदी असलेल्या मयुरी कांगो (Mayuri Kango) यांनी औरंगाबादमधील हवामान कृती योजना आराखड्यासाठी गुगल कंपनीच्या माध्यमातून मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटीची (Smart City) टीम आणि गूगल उद्योग प्रमुख मयुरी कांगो यांची नुकतीच एक ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत त्यांनी औरंगाबाद स्मार्ट सिटीला मदत करण्याचे आश्वासन दिले. औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक तसेच स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र शासन आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया यांच्या सहकार्याने शहरासाठी हवामान कृती योजना आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. शहराच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. याद्वारे आगामी 30 वर्षांपर्यंत शहराचे वातावरण स्वच्छ आणि राहण्यासाठी सुलभ करण्याचा उद्देश साध्य होईल, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
काय आहे हवामान कृती योजना आराखडा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉप 26 या ग्लासगो येथील परिषदेत स्वच्छ वायू आणि स्वच्छ वातावरण निर्मितीचे उद्दिष्ट निर्धारीत केले होते. त्यासंबंधीच औरंगाबादमधील हवामान कृती योजना आराखडा आहे. वर्ल्ड रीसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया सोबत या आराखड्याबद्दल करार करण्यात आला आहे. ही संस्था येत्या तीन वर्षात मनपा सोबत मिळून हा आराखडा तयार करणार आहे. यासाठी महानगरपालिकेत क्लायमेट सेलची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. मनपा उपायुक्त सौरभ जोशी यांच्या नेतृत्वाखाली हे काम होत आहे.
औरंगाबादच्या हवामान कृती आराखड्याचे दोन प्रमुख भाग आहेत. शहरात झालेले प्रदूषण कमी करणे आणि दुसरा म्हणजे शहरातील नागरिकांना हवामान बदलासाठी तयार करणे. प्रदूषण कमी करण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर झाडे लावणे, नद्यांची स्वच्छता करणे, तसेच इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर वाढवण्यासाठी जनजागृती करणे असे अनेक उपाय योजले जाणार आहेत.

स्मार्ट सिटीच्या टीमसोबत बैठक
गूगलकडून काय मदत होणार?
शहरातील नद्या, पाणी, वाहतूक आणि पर्यावरण इत्यादी विविध गोष्टींची माहिती गूगल इंसाइट्सवर गोळा होत असते. ही माहिती प्रशासनाला मिळाली तर हा आराखडा तयार करण्यासाठी आणि इतर विकास कामांसाठी मदत होईल. गूगलतर्फे ही माहिती महापालिकेला पुरवली जाईल, असे आश्वासन गुगल उद्योग प्रमुख मयुरी कांगो यांनी दिले. या बैठकीत स्मार्ट सिटीने केलेल्या कामांचा आढावा देण्यात आला. त्याचबरोबर औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या या आणि अनेक इतर उपक्रमांसाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी औरंगाबाद स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक आदित्य तिवारी, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर, प्रकल्प सहयोगी किरण आढे, मीडिया विश्लेषक अर्पिता शरद यांची उपस्थिती होती.
गूगल उद्योग प्रमुख मयुरी कांगो औरंगाबादची कन्या
सध्या गूगल उद्योग प्रमुख पदावर कार्यरत असलेल्या मयुरी कांगो या औरंगाबादच्या कन्या आहेत. सध्या त्यांचं पद आदरार्थी सांगावं लागतं, पण एकेकाळी त्या चित्रपट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आणि लोकप्रिय अभिनेत्री होत्या. पापा कहते है, घर से निकलते ही कुछ दूर चलते ही.. या गाण्यातून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली मयुरी कांगो ही औरंगाबादमधील भालचंद्र कांगो आणि सुजाता कांगो दाम्पत्याची मुलगील .19 ऑगस्ट 1982 मध्ये जन्मलेल्या मयुरीने औरंगाबादमधील देवगिरी कॉलेमध्ये शिक्षण घेतले. इथूनच तिच्या बॉलिवूडच्या करिअरला सुरुवात झाली. नव्वदीच्या दशकात बेताबी, होगी प्यार की जीत, बादल, पापा द ग्रेट सारख्या चित्रपटात अभिनय केलेल्या मयुरी कांगो हिने 2000 मध्ये चित्रपटसृष्टीतून एक्झिट घेतली. 2003 मध्ये तिने एनआरआय आदित्य ढिल्लन यांच्याशी लग्न केले. त्यानंतर ती अमेरिकेत गेली. युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कमधून एमबीए केले. एकानंतर एक कॉर्पोरेट कंपन्यांत काम करु लागली. गूगल इंडिया कंपनीत प्रवेश हा तिच्या या नव्या करिअरमधील सर्वोच्च बिंदू ठरला. एक यशस्वी कॉर्पोरेट ऑफिसर पदावर ती आज गूगल इंडिया या जगातील सर्वात मोठ्या आयटी आणि सर्च इंजिन कंपनीत काम करतेय. मात्र आजही औरंगाबाद शहराशी ती जोडलेली आहे. आता औरंगाबाद शहरातील हवामान सुधारण्याच्या प्रक्रियेत गूगलतर्फे मदत करण्याचे आश्वासन तिने दिले आहे.
इतर बातम्या-
