एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आज खुलताबादेत, मनपा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक

एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी आज खुलताबादेत, मनपा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक
खुलताबादेत एमआयएम पक्षाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक

औरंगाबादः ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी (Asduddin Owaisi) यांचे शुक्रवारी औरंगाबाद शहरात आगमन झाले. आज शनिवारी खुलताबाद (Khultabad) येथे एमआयएमच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. औरंगाबादमधील आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात काय रणनिती आखायची यावर या बैठकीत चर्चा होत आहे. दरम्यान, काल शुक्रवारी असदुद्दीन ओवैसी यांचे औरंगाबादेत आगमन झाले त्यावेळी कार्यकर्त्यांची आणि चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. शुक्रवारी दुपारी जामा मशिदीत नमाज अदा करून ते हॉटेल ताजमध्ये आराम करण्यासाठी निघून गेले.  अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी आले होते. रात्री खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) व इतर पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.

खुलताबादेत आज पदाधिकाऱ्यांची बैठक

आज शनिवारी एमआएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी खुलताबाद येथे राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहेत. त्यात औरंगाबाद निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष रणनीती आखण्यासंदर्भात चर्चा होईल. तसेच येत्या काळात पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा खांदेपालट होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्याविषयीदेखील या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता असदुद्दीन ओवैसी हे पत्रकार परिषद घेतील.

मागील निवडणुकीत शिवसेनेनंतर सर्वाधिक नगरसेवक एमआयएमचे

यापूर्वीच्या महापालिका निवडणुकीचा निकाल पाहता शिवसेना – 29, भाजप – 22, एमआयएम – 25, कॉंग्रेस – 10
राष्ट्रवादी – 03, बसप – 05, रिपब्लिकन पक्ष – 01, अपक्ष – 18 असे नगरसेवक निवडून आले होते. म्हणजेच शिवसेनेनंतर औरंगाबादमध्ये एमआयएम पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून आले होते. आता ही संख्या कायम राखत आणखी जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील, नव्या प्रभागरचनेनुसार पक्ष बांधणीसाठी काय आराखडे आखावे लागतील, याविषयी या बैठकीत चर्चा होईल.

पक्षातील मतभेदांवर चर्चा होण्याची शक्यता

23 ऑक्टोबर रोजी एमआएमच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, प्रदेश सचिव मौलाना महेफुज उर्ररहमान फारुकी व खासदार इम्तियाज जलील यांच्यातील मतभेद उघड झाले होते. पक्षातील मातब्बर नेते समजल्या जाणाऱ्या या तिघांमधील मतभेद दूर करण्यावर आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.

ताज्या वादाचे कारण बॅनर

एमआयएमच्या तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये बॅनरवरून वाद झाल्याचे कळते. एमआयएमच्या बॅनरवर डॉ. गफ्फार कादरी आणि मौलाना महेफुज रहमान यांचे फोटोच नाहीत, यावरून हे दोन्ही नेते इम्तियाज जलील यांच्यावर नाराज आहेत. याला जलील यांनीही उत्तर दिले. मी लोकसभेला उभा राहिलो तेव्हा काही लोक मला दीड लाखही मते मिळणार नाहीत, असे म्हणत होते. हरलो असतो तर मी सेटिंग केल्याचा आरोप केला असता. पण लोकांच्या आशीर्वादाने मी जिंकलो. आता पोस्टरवरील फोटोबाबत कुणाची नाराजी असेल तर स्वतःच्या पैशांनी शहरभर फोटो लावावेत, असे उत्तर जलील यांनी दिले आहे. आता पक्षाचे अध्यक्ष या तिघांमधील वाद कसा शमवतात, हे पहावे लागेल.

इतर बातम्या-

अतिक्रमणाच्या विळख्यातून पैठण गेटची मुक्तता, औरंगाबाद महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई

काय सांगता? औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त होणार? कोर्टाच्या नोटिशीकडे दुर्लक्ष भोवले, जप्तीसाठी पथक दारात 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI