संभाजीनगर राड्याचं गाऱ्हाणं थेट पंतप्रधानांकडे, खा. इम्तियाज जलील यांचं नरेंद्र मोदी यांना पत्र, काय केली मागणी?
खासदार जलील यांनी घटनेत पोलीस सहभागी असल्याचा संशय यापूर्वीदेखील व्यक्त केला होता. पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी अनेक गंभीर आरोप केलेत.

छत्रपती संभाजीनगर : रामनवमीच्या (Ramnavami) पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरात घडलेल्या राड्याचं प्रकरण अद्याप शमलं नाहीये. आता एमआयएम खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jaleel) यांनी या प्रकरणात महत्त्वाची भूमिका मांडली आहे. या घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावे , अशी विनंत खा. जलील यांनी पंतप्रधानांना केली आहे. खासदार जलील यांनी घटनेत पोलीस सहभागी असल्याचा संशय यापूर्वीदेखील व्यक्त केला होता. पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी अनेक गंभीर आरोप केलेत.
खा. जलील यांचं पत्र काय?
खासदार इम्तियाज जलील यांनी प्रधानमंत्री मोदी यांना दिलेल्या पत्रात सविस्तरपणे नमूद केले की, 30 मार्च 2023 रोजी रामनवमीच्या सणाच्या आदल्या रात्री औरंगाबाद, महाराष्ट्रातील किराडपुरा भागात दुर्देवी घटना घडली. ज्यामध्ये पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. या घटनेने पोलिसांच्या भूमिकेवर किंवा हिंसाचाराच्या ठिकाणी त्यांच्या अनुपस्थितीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
खा. जलील यांनी पुढे लिहिले की, मी स्वतः मंदिरात 2 तासांहून अधिक काळ उपस्थित होतो आणि केवळ 15 पोलीस यावेळी होते. ज्यांना केवळ मंदिराचे रक्षण करणार्यांपासूनच नव्हे तर दगडफेक करणार्या आणि वाहनांची जाळपोळ करणार्या 100 हून अधिक लोकांच्या गर्दीला तोंड देण्याचे काम सोपविण्यात आले होते. यात 13 वाहने जळाली असून त्यातील बहुतांश मोठमोठ्या पोलिस व्हॅन होत्या. त्या रात्री घडलेल्या सर्व घडामोडींचा मी साक्षीदार आहे. कारण वारंवार बेशिस्त गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्यावर मी राममंदिराच्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी स्वत: उभा होतो, असं खा. जलील यांनी पत्रात लिहिलंय.
त्या दिवशी पोलीस कुठे होते?
समाजकंटकांना हिंसाचार करण्यास मोकळे का सोडण्यात आले ? आणि त्या रात्री पोलिसांच्या 13 गाड्या जाळण्यात आल्या, तेव्हा पोलिस कुठे गेली होती? हा मोठा प्रश्न आहे. योगायोगाने आपले संपूर्ण शहर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा एक भाग म्हणून सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या कक्षेमध्ये आहे. ते सीसीटीव्ही फुटेज कुठे आहेत; ज्यात पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत? अग्निशमन दलाच्या गाड्यांना मध्यंतरी का थांबवण्यात आले ? आणि ज्या ठिकाणी वाहने जाळली जात आहेत त्या ठिकाणी जाण्यास पोलिसांनी परवानगी का दिली नाही ? असे अनेक गंभीरस्वरुपाचे प्रश्न दिलेल्या पत्रात उपस्थित केले.
यामागे कुणाचं षडयंत्र होतं?
या घटनेमागे नेमकं कुणाचं षडयंत्र आहे, दंगल सदृस्य स्थिती निर्माण करण्यामागे कुणाचा हात आहे, कुणाच्या सांगण्यावरून हे नियोजित आणि अंमलात आणलं गेलं, याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. या घटनेमुळे देशात मोठा अनर्थ घडला असता, सत्य बाहेर येण्याची गरज आहे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रातून केली आहे.
