जरांगेंना मारण्याचं कारस्थान, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
संजय राऊत यांनी सरकारवर मनोज जरांगेंना संपवण्याचं आणि मारण्याचं गंभीर कारस्थान करत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. मराठवाडा पेटलेला आहे आणि सरकारला पेटवण्यातच मजा आहे. त्यांना पेटलेला मराठवाडा विझवता येणार नाही. फडणवीसांनी मराठवाड्याचा इतिहास समजावून घ्यावा, असंही राऊत म्हणाले.

मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. आपल्या समाजाचे काही प्रश्न घेऊन ते उपोषण करत आहेत. पण सरकार दरवाजा बंद करून त्यांच्या विरोधात कारस्थानं करत आहेत. जरांगेंना संपवायचं कसं? त्यांना मारायचं कसं याचं कारस्थान सुरू आहे, असा आरोप करतानाच म्हणून मराठवाडा अजून पेटलेला आहे. सरकारला फक्त पेटवण्यात मजा आहे. विझवण्यात काही स्वारस्य राहिलं नाही. पण एकदा मराठवाडा पेटला तर विझवता येत नाही हे फडणवीस यांना माहीत नाही. फडणवीस यांनी मराठवाड्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नांदेडमध्ये उबाठाच्या मोर्च्याला संबोधित करताना संजय राऊत यांनी हा आरोप केला. अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून हे उत्तम आंदोलन उभं राहिलं आहे. आज फक्त हे धरणे आंदोलन आहे. जर प्रश्न सुटले नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. दानवे यांना या आयडिया सूचतात कुठून? तुमसे ना हो पायेगा म्हणजे हे सरकार नामर्द आहे. जेव्हा सरकार नालायक असतं, लोकांचे प्रश्न सोडविण्यात नामर्द असतं, तेव्हा त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार राहत नाही, असा हल्ला राऊत यांनी चढवला.
हे सरकार मेलंय
सरकार मेलं आहे. डेडबॉडी आहे. ही डेडबॉडी उचलायला पाहिजे. सरकार मेलंय तर फडणवीस यांनी रडायला पाहिजे. त्यांनी छाती पिटायला पाहिजे. शिंदेंनी रडायला पाहिजे. ते गेलेत इंग्लंडला. काय करतात तिकडे जाऊन? असा सवाल करतानाच या सरकारची डेडबॉडी आता शेतकरी उचलतील. अंतिम संस्कार करतील. मराठवाडा, नादेंडमध्ये जे प्रकल्प अर्धवट आहेत. त्यात तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला.
ठाकरेंचं सरकार 5 हजार कोटीत पाडलं
5 हजार कोटीत उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं. 120 कोटी रुपये हॉटेलमध्ये राहण्यासाठी खर्च करण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्याकडून 120 कोटी रुपये निवडणूक विभागाने घेतले, असा आरोप राऊत यांनी केला. 14 वर्षापूर्वी मोदींचा ईव्हीएम मशीनवर विश्वास नव्हता. काँग्रेस कशी जिंकते? असा सवाल केला जायचा. आता आम्ही म्हणतोय ईव्हीएम बदला. पण ते म्हणतात ईव्हीएम हवी आहे, असं राऊत म्हणाले.
हे दगाबाज सरकार
एमपीएससी पेपर फुटीवरूनही त्यांनी सरकारवर हल्ला चढवला. आम्ही उद्रेक आणि आंदोलनाच्या दिशेने जात आहोत. त्याला शिंदे आणि फडणवीस जबाबदार आहेत. हे सरकार माजोरडी आहे. हजारो विद्यार्थी रस्त्यावर आहेत. पण सरकार काहीच करत नाहीये. हे दगाबाजांचं सरकार आहे. हे सरकार विश्वासघातकी आणि दगाबाज लोकांच्या पाठिंब्यावर उभं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल त्यांनी केला.
