औरंगाबाद जिल्ह्यातील ई-फेरफार 14 दिवस बंद, तलाठ्यांचा संप सुरूच, पुण्यातली तोडग्याची बैठक निष्फळ

जिल्ह्यातील 450 तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे डीएससी म्हणजेच डिजिटल सिग्नेचर कोड जमा केले आहे. त्यामुळे सर्व तलाठी कार्यालयातील कामकाज ठप्प आहे. तलाठ्यांची मागणी मान्य होईपर्यंत संप सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या अनेक व्यवहारांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ई-फेरफार 14 दिवस बंद, तलाठ्यांचा संप सुरूच, पुण्यातली तोडग्याची बैठक निष्फळ
प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबादः तलाठी संघाच्या पदाधिकाऱ्याविरोधात राज्य जमाबंदी आयुक्तालयातील राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी रामदास जगताप (Ramdas Jagtap) यांनी सोशल मीडियातून अपशब्ध वापरल्यामुळे राज्यातील तलाठी संतप्त झाले आहेत. याविरोधात त्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे. 24 ऑक्टोबर रोजी या संपावर तोडगा काडण्यासाठी पुण्यात बैठक झाली. मात्र या बैठकीत तलाठ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाइन कामकाज पुढील 14 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय तलाठी महासंघाने घेतला आहे. रामदास जगताप यांची बदली होईपर्यंत ऑनलाइन काम बंद राहील मात्र महसूल काम सुरु राहील, असा पवित्रा तलाठी महासंघाने घेतला आहे.

11ऑक्टोबर पासून संप

राज्यातील तलाठ्यांनी 11 ऑक्टोबर पासून संपाला सुरुवात केली आहे. रामदास जगताप यांची तातडीने बदली करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. रविवारी पुण्यात झालेल्या बैठकीतही यावर तोडगा निघालेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील 450 तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी बेमुदत संप करीत सातबाराच्या ई-फेरफारीला ब्रेक लावला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महसुली कामे थंडावली आहेत. तलाठ्यांची मागणी मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार असून तलाठ्यांनी तहसीलदारांकडे जमा केलेल्या डीएससी (डिजिटल सिग्नेचर कोड) ताब्यात घेणार नसल्याचे जिल्हा तलाठी महासंघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

राज्य तलाठी महासंघटनेच्या अध्यक्षांनी सर्व तलाठी संघाच्या सोशल मीडिया ग्रुपवर गेल्या आठवड्यात पंचनामे, पीक पाहणीबाबत एक मेसेज व्हायरल केला होता. हा मेसेज पुण्यातील तलाठी संघाच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या ग्रुपवर शेअर केला. त्यावर जगताप यांनी अपशब्द वापरल्याने तलाठी संघ आक्रमक झाला आहे.

रविवारी थोरातांच्या उपस्थितीत बैठक

रविवारी पुण्यात झालेल्या या बैठकीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अतिरिक्त मुख्य महसूल सचिव नितीन करिर यांच्यासह राज्यातील तलाठी महासंघ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान बुधवार पासून औरंगाबादमध्येही हा संप सुरु आहे. जिल्ह्यातील 450 तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे डीएससी म्हणजेच डिजिटल सिग्नेचर कोड जमा केले आहे. त्यामुळे सर्व तलाठी कार्यालयातील कामकाज ठप्प आहे. तलाठ्यांची मागणी मान्य होईपर्यंत संप सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या अनेक व्यवहारांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.

इतर बातम्या-

औरंगाबादः जानेवारीत राष्ट्रीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन, ऑटोमोबाइल कंपन्यांच्या प्रतिनिधींना ऑरिक सिटीची सफर

मनपा निवडणुकीसाठी एमआयएमच्या मोर्चेबांधणीला वेग, असदुद्दीन ओवैसी दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI