काय ही आरेरावी? औरंगाबादेत कोरोना कॅम्पमध्येच शिवशाही चालकाने बस घातली, खुर्च्यांची मोडतोड, कर्मचाऱ्याचे अपहरण, सलग दुसरी घटना

रविवारी झाल्टा फाट्याजवळ तपासणी कर्मचाऱ्याची घटना ताजी असतानाच सोमवारी आणखी एक असाच प्रकार घडला. नगर नाका येथे कोरोना चाचणी कॅम्प परिसरातच शिवशाही चालकाने बस घातली व तेथील खुर्च्यांची मोडतोड केली.

काय ही आरेरावी? औरंगाबादेत कोरोना कॅम्पमध्येच शिवशाही चालकाने बस घातली, खुर्च्यांची मोडतोड, कर्मचाऱ्याचे अपहरण, सलग दुसरी घटना
सोमवारी नगर नाक्याजवळील घटनेत आरेरावी करणारा चालक

औरंगाबाद: शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक बस आणि वाहनातील चालक, प्रवाशांची कोरोना व लसीकरणविषयक चौकशी, चाचणी करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेने  (Aurangabad Corporation)सहा पॉइंटवर तपासणी केंद्र उभारली आहेत. मात्र येथील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेगळ्याच अनुभवांना तोंड द्यावे लागत आहे. रविवारी सकाळी झाल्टा फाट्याजवळ (Zalta Fata) कोरोना चाचणी करण्यासाठी आवाहन करणाऱ्या मनपाच्या आरोग्य कर्मचाऱ्याचे खासगी ट्रॅव्हल्सचालकाकडून (Shivshahi driver) अपहरण करून मारहाण झाल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच सोमवारी आणखी एक असाच प्रकार घडला. नगर नाका (Nagar Naka) येथे कोरोना चाचणी कॅम्प परिसरातच शिवशाही चालकाने बस घातली व तेथील खुर्च्यांची मोडतोड केली.

कॅम्पमध्ये बस घातली, कर्मचाऱ्याचे अपहरण

नगर नाका येथील गोलवाडी फाटा येथे पालिकेचे एक केंद्र आहे. या केंद्रात पुणे, नगर मार्गे येणाऱ्या नागरिकांची चाचणी केली जाते. पुणे, नगरहून येणारी वाहने इथे थांबवली जातात. सोमवारी सकाळी पुणे-औरंगाबाद ही शिवशाही बस (एमएच 11 टी 9246) आली. केंद्रावरील कर्मचारी अमोल खाजेकर व लॅब टेक्निशियन अक्षय शेळके यांनी ती बस थांबवली व बसमध्ये जाऊन प्रवाशांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले. मात्र बसच्या चालकाने विरोध केला व बसचे दार बंद करून या दोन कर्मचाऱ्यांना बळजबरीने घेऊन बस थेट बसस्थानकात आणली. त्यानंतर ‘कुणाला सांगायचे ते सांग,’ असे म्हणत कर्मचाऱ्यांना बसमधून उतरून दिले, अशी माहिती खाडेकर व शेळके यांनी दिली. दोन्हीही कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे.

रविवारी परप्रांतीय चालकाची आरेरावी

हैदराबाद-अरुणाचल प्रदेश ही बस रविवारी सकाळी 11 वाजता झाल्टा फाटा येथील तपासणी नाक्यावर आली होती. महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस बसमध्ये चढले. मात्र चालकाने गाडी बाजूला घेण्याचे निमित्त सांगितले व सर्व कर्मचाऱ्यांना खाली उतरवले. दरम्यान केंद्रप्रमुख कैलास जाधव हे बसमध्येच होते. चालकाने बस न थांबवता वेगाने पुढे नेली. तपासणी पथकातील केंद्र प्रमुख कैलास जाधव यांना बसचालकाने तब्बल 35 किलोमीटर अंतरावर नेले. या परप्रांतीय ट्रॅव्हल्स कामगारांनी त्यांना बेदम मारहाणही केली. इकडे पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले.

6 एंट्री पॉइंटवर सशस्त्र पोलीस बंदोबस्त

रविवारी झाल्टा फाटा येथे कोरोना चाचणीसाठी आग्रही असलेल्या कर्मचाऱ्याला ट्रॅव्हल्समधील चालक व इतरांनी मारहाण केली होती. या प्रकाराची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली आहे. आता सहाही एंट्री पॉइंटवरील चाचणी केंद्रांवर 24 तास शस्त्रधारी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच अपहरण झाले तरी कर्तव्य बजावणारे कैलास जाधव आणि पथकप्रमुख बालाजी ढवळे व सहकारी प्रदीप राठोड यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. तसेच रविवारी जाधव यांचे अपहरण केलेली ट्रॅव्हल्सची बस दोन दिवसात जप्त करून आणण्याचे आदेश आरटीओच्या अधिकाऱ्यांना दिले.

इतर बातम्या-

मनपा निवडणुकीसाठी एमआयएमच्या मोर्चेबांधणीला वेग, असदुद्दीन ओवैसी दोन दिवसांच्या औरंगाबाद

अपघात पाहताच थांबले, जखमी मुलाचा चेहरा रुमालाने पुसला, औरंगाबादेत डॉ. कराड यांनी दिला माणुसकीचा दाखला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI