भगवान भरोसे आहे का क्रांती चौक उड्डाणपूल? औरंगाबादच्या पुलावरील मेख ते प्रशासकीय गोंधळ, वाचा सविस्तर..
एकिकडे शहरात चिकलठाणा ते वाळूज असा अखंड उड्डाणपुलाच्या चर्चा सुरु आहेत तर दुसरीकडे शहरातील प्रमुख क्रांती चौक उड्डाणपुलाची जबाबदारी घेण्यावरून चांगलंच नाट्य रंगलं आहे.

औरंगाबादः एकिकडे शहरात चिकलठाणा (Chikalthana) ते वाळूज (Waluj) अशा अखंड उड्डाणपुलाच्या चर्चा सुरु आहेत तर दुसरीकडे शहरातील प्रमुख क्रांती चौक उड्डाणपुलाची जबाबदारी घेण्यावरून चांगलंच नाट्य रंगलं आहे. क्रांती चौक उड्डाण पुलाच्या मधोमध असलेल्या फटीवरून सध्या प्रशासकीय गोंधळ माजला आहे. दररोज सुमारे 40 हजार वाहने ज्या पुलावरून जातात, त्या पुलावर एवढी मोठी फट असणे किती घातक आहे, यासंबंधीचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले. त्यानंतर ही दुरुस्ती कुणी करायची, यावरून गोंधळ माजला आहे. गुरुवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी या पुलाची पाहणी केली. त्यांच्यासमोरही या पुलाची जबाबदारी घेण्यास कुणी तयार झाले नाही. महापालिका, MSRDC आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यापैकी कुणाकडे या पुलाचा ताबा आहे, हा गुंता अजूनही सुटलेला नाही.
तूर्तास MSRDC दुरुस्ती करणार
नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे आधी पूलाची दुरुस्ती. या प्रकरणी उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर MSRDC ने पुलाची दुरूस्ती करून देण्याचे तूर्तास मान्य केले आहे. मात्र पुढील जबाबदारी आपली नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गुरुवारी यासंबंधी एक बैठक घेतली आणि सर्वच उड्डाणपुलांची जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना दिल्या.
काय आहे नेमका गुंता?
MSRDC ने औरंगाबादेत 2011 ते 2016 या काळाच पाच उड्डाणपूलांचे काम केले. प्रत्येक पुलासाठी दोष निवारण कालावधी पाच वर्षांचा होता. हा कालावधी संपल्यानंतर MSRDC ने हे पूल संबंधित यंत्रणांकडे हस्तांतरीत करणे अपेक्षित असते. मात्र हस्तांतरणाची ही प्रक्रिया अर्धवट असल्याचा आरोप महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. MSRDC म्हणते- 2018 मध्ये क्रांती चौक उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरीत केला. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतो– केंद्र सरकारच्या निधीतून रस्ते, पूल आम्हीही बांधतो आणि संबंधित यंत्रणेकडे हस्तांतरीत करतो. मग हा पूल आमच्याकडे येण्याचा प्रश्नच नाही. महापालिका म्हणते– अभियंते सखाराम पानझडे म्हणतात, जालना रोडच आमच्या ताब्यात नाही तर उड्डाणपूल कसा येईल? हस्तांतरणाची प्रक्रियाही अर्धवट आहे. ती पूर्ण करायची असेल तर या पूर्ण रस्त्यावरील, उड्डाणपुलावरील दुरुस्ती करूनच तो महापालिकेच्या ताब्यात द्यायला हवा. त्यानंतरच त्याचे कागदोपत्री हस्तांतरण करावे.
इतर बातम्या-
